सेंट जॉर्जेसमध्ये स्वस्तात ‘लिव्हर सेंटर’, कामा रुग्णालयात होणार सवलतीत आयव्हीएफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:46 AM2024-03-08T09:46:51+5:302024-03-08T09:47:57+5:30
लोकोपयोगी सेवा-सुविधांचे लोकार्पण; गाेरगरीब रुग्णांना मिळाला दिलासा.
मुंबई : जे. जे. समूह रुग्णालयाच्या अखत्यारीतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात आता यकृत (लिव्हर) सेंटर सुरू करण्यात येणार असून, तेथे यकृताशी निगडित शस्त्रक्रिया आणि उपचार होणार आहेत, तर वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यासाठी खासगी रुग्णालयातील महागडे असणारे उपचार ‘आयव्हीएफ’ आता कामा रुग्णालयात करण्यात येणार आहे. या दोन्ही विभागांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. त्यामुळे आता गरीब रुग्णांनासुद्धा या आजारांवरील उपचार सवलतीच्या दरांत या रुग्णालयात मिळणार आहेत.
कामा रुग्णालयातील आयव्हीएफ सेंटर, स्त्री रोग विभागातील ‘मॉड्युलर लेबर रूम’, सेंट जॉर्जेस रुग्णालयातील लिव्हर सेंटर आणि जे. जे. रुग्णालयातील कॅथलॅब या विविध लोकोपयोगी सेवा-सुविधांचा लोकार्पण सोहळा नुकताच कामा रुग्णालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला.
त्यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर, कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे उपस्थित होते.
यकृताशी संबंधित उपचार करण्यासाठी अनेकवेळा रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असते. कारण शासकीय रुग्णालयांत अद्यापही फारसे या आजारांवर उपचार केले जात नाहीत. विशेष म्हणजे यकृतावरील शस्त्रक्रिया तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या खूप महाग आहेत. त्या सर्वसामान्यांना परवडाव्यात या हेतूने सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिव्हर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
जे. जे. मध्ये नवीन कॅथलॅब :
१) जे. जे. रुग्णालयात सध्या असणारी कॅथलॅब मशीन जुनी झाली असून, तेथे अद्ययावत कॅथलॅब मशीन बसविण्यात आली आहे.
२) गेल्या काही महिन्यांपासून जुनी मशीन अनेकवेळा मध्येच बंद पडत असल्याने रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन हृदयविकाराचे उपचार घेत होते.
३) जे. जे. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात या नवीन मशीन बसविण्यात आली.
४) गेल्या काही वर्षांत तरुण जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढले असून, अनेक जोडपी वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेत आहेत.
५) खासगी रुग्णालयात या आजारावरील उपचार महाग असल्याने ते गरिबांना परवडत नाही. त्यामुळे शासनाने या आजारावरील उपचारांचे क्लिनिक कामा रुग्णालयात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गरिबांना वंध्यत्वावरील उपचार घेणे शक्य होणार आहे.