मुंबई - पावसाळ्याच्या दिवसांत उघडे मॅनहोल हे मृत्यूचे सापळे ठरत असल्यावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महापालिका जागी झाली आहे. महापालिकेने भुयारी गटारांच्या मॅनहोलच्या झाकणांची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले असतानाच मंगळवारी बोरीवलीत एमएचबी कॉलनी पोलिसांनी १५ झाकणांची चोरी करणाऱ्यास अटक केली आहे.कमलेश ऊर्फ बंटी सोलंकी (२९) असे त्याचे नाव असून, तो अब्दुल नजीर शहा (५१) यास चोरीच्या झाकणांची विक्री करायचा. त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोलंकी नशेसाठी झाकणांची चोरी करायचा.
बोरीवली परिसरात तब्बल २६ झाकणांची चोरी झाली होती. आयसी कॉलनी येथील डांबरी रस्त्यावर मध्यभागी असलेले लोखंडी झाकण चोरीला गेले होते. पालिकेच्या आर विभागाकडून २० जून रोजी प्राजक्ता दवंगे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक निरीक्षक सूर्यकांत पवार, पोलिस निरीक्षक अखिलेश बोंबे व पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. बोरीवलीतील एका सीसीटीव्हीमध्ये सोलंकी झाकण चोरताना दिसला होता.
उघड्या मॅनहोलने डॉक्टरचा घेतला होता बळीमुंबईत २९ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या मुसळधार पावसात लोअर परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयाचे ५८ वर्षीय गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास प्रभादेवी येथील घरी जाण्यासाठी डॉ. अमरापूरकर निघाले. साडेसहा वाजता त्यांनी एलफिन्स्टन पश्चिमेकडील दीपक सिनेमाजवळ गाडी सोडून ड्रायव्हरला घरी जाण्यास सांगितले व स्वतः चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, चालताना ते उघड्या मॅनहोलमध्ये पडले होते.
भंगारात २५ रुपये किलोचौकशीत बंटी सोलंकी याने नशा करण्यासाठी अवघ्या २५ रुपये किलोने भंगार विक्रेता शहा याला ही झाकणे विकल्याचे उघड झाले. आरोपीकडून चोरी केलेल्या झाकणांचे साडेनऊ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
हायकोर्टाने फटकारले आणि...n कुठेही मॅनहोल उघडे राहता कामा नये, असा स्पष्ट आदेश पाच वर्षांपूर्वीच दिलेला असतानाही हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच नापसंती व्यक्त केली होती. एकूण ७४ हजार ६८२ मॅनहोलपैकी पूरसदृश भागांतील एक हजार ९०८ मॅनहोलना संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने जाब विचारला होता.n मॅनहोलवरील झाकणे चोरीला जाणे, हा गंभीर गुन्हा आहे. पालिकेने याबाबत पोलिसांकडे रीतसर तक्रार करावी, नागरिकांनीही उघडी मॅनहोल दिसली की तक्रार करावी, असे सांगत पालिकेने झाकण चोरीला गेल्याबद्दल तक्रारी केल्या आणि पोलिसांनी किती जणांवर कारवाई केली, याची माहिती सादर करावी, अशा सूचना उच्च न्यायालयाने केल्या.
दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यूगोरेगाव पूर्वच्या आंबेडकर नगर परिसरात जुलै, २०१९ मध्ये दिव्यांश सिंग (वय २) हा चिमुकला उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.