Join us

खोटं बोलून मुंबईची विद्यार्थीनी फिरुन आली थायलंड; एक चूक केली अन् थेट गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 4:02 PM

मुंबई विमानतळावर एका विद्यार्थीनीला पासपोर्टसोबत छेडछाट करणे चांगलेच महागात पडलं आहे.

Mumbai Airport : खोटं बोलून थायलंड फिरायला जाणे एका विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडलं आहे. हे प्रकरण इतकं वाढलं की २५ वर्षीय विद्यार्थिनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस या सगळ्या  प्रकरणाचा तपास करत आहे. थायलंड सहलीबद्दलची माहिती लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या पासपोर्टमध्ये छेडछाड केली. त्यामुळे तिला या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

२५ वर्षीय विद्यार्थिनी फॅशन डिझायनींगचा अभ्यास करते. गुरुवारी ती सिंगापूरला जाण्यासाठी विमानात बसण्यासाठी मुंबईविमानतळावर पोहोचली होती. मात्र सुरक्षारक्षकांनी तिला गेटवरच थांबवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांना विद्यार्थीच्या पासपोर्टमधून चार पाने गहाळ झाल्याचे आढळल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एसएस घाटोल असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. 

घाटोल ही प्रथम वर्षाची विद्यार्थीनी इंटर्नशिपसाठी टुरिस्ट व्हिसावर देशाबाहेर जात होती. पण विद्यार्थीने तिच्या थायलंड सहलीची वस्तुस्थिती तिच्या शैक्षणिक संस्थेपासून लपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने पासपोर्टमध्ये छेडछाड केली होती. घाटोल ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान थायलंडली गेली होता. घाटोलने  तब्येत बरी नसल्याचे सांगत परीक्षेला बसण्यापासून सूट मागितली होती. मात्र या दरम्यान ती थायलंडला जाऊन आली. मात्र आपण पकडले जावू या भीतीने तिने पासपोर्टची चार पानेच फाडून टाकली.

इमिग्रेशन अधिकारी  सुजीत पाटील यांनी सांगितले की, शिक्षण संस्थेने इंटर्नशिपसाठी सिंगापूरला जाताना आपला पासपोर्ट मागितला तर आपलं पितळ उघडं पडेल याची भीती घाटोलला होती. त्यामुळे तिने पासपोर्टची चार पाने फाडून टाकली. मात्र इंटर्नशिपसाठी जात असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या पासपोर्टची पाने गायब असल्याचे समोर आलं. त्यामुळे पासपोर्ट कायद्यानुसार घाटोलविरुद्ध कायद्याचे उल्लंघन आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २०२२ सालीही असेच एक प्रकरण समोर आलं होतं. पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून परदेश वारीची माहिती लपवण्यासाठी त्याच्या पासपोर्टची काही पाने फाडली होती. पती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परदेशात गेला होता. त्याने त्याचे विवाहबाह्य संबंधाची वस्तुस्थिती देखील लपवली होती. मात्र पासपोर्टसोबत छेडछाड करणे हा गुन्हा आहे हे त्याला माहीत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीविमानतळ