मुंबईतील विद्यार्थ्यांनी परिक्षांवर बहिष्कार टाकावा; छात्रभारतीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:54 PM2020-07-08T14:54:10+5:302020-07-08T14:54:40+5:30
UGC विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत आहे. वारंवार बदलती भुमिका विद्यार्थ्यांना छळणारी आहे व यात विद्यार्थी हिताचे कोणालाच काही पडले नाही.
मुंबई: अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत युजीसीचा निर्णय हा निषेधार्य आहे. विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जात असुन भाजपा व संलग्न संघटनांकडुन गलिच्छ राजकारण केले जात आहे. त्यामुळे या निर्णय विरोधात विद्यार्थ्यांनी असहकार आंदोलन सुरु करुन जोपर्यंत करोनावर लस निघत नाही व मुंबई ग्रीन झोन घोषित होत नाही तोपर्यंत सर्व परिक्षांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी केले आहे.
UGC विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत आहे. वारंवार बदलती भुमिका विद्यार्थ्यांना छळणारी आहे व यात विद्यार्थी हिताचे कोणालाच काही पडले नाही. भाजपा अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. बिगर भाजपा शासित राज्यसरकारने परिक्षा रद्द केल्याचे निर्णय घेतल्याने जाणीवपूर्वक भाजपा परिक्षा घेण्याचा घाट रचत आहे.
अंतिम वर्षाच्या परिक्षा ह्याच जर एवढ्या महत्वाच्या असतात मग मागच्या अनेक वर्षापासुन आपण एकत्रित ६ सेमिस्टरचे मुल्यमापन करुन निकाल का लावत आहात? मुलांनी ५ सेमिस्टरपर्यंत परिक्षा दिलेल्या आहेत त्याचे मुल्यमापन करुन सहज निकाल लावता येऊ शकतो पण विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम युजीसी करत आहे.
याआधीच परिक्षा न घेता मुल्यांकन कसे करता येईल हे मार्गदर्शक सुची मध्ये युजीसेने सांगितले असताना पुन्हा असा कडक पवित्रा घेत विद्यार्थ्यांना का त्रास दिला जातोय हे स्पष्ट होत नाही.. मुंबईत करोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ठिकठिकाणी शाळा,कॉलेजेस विलगीकरणासाठी वापरले आहेत. अनेक ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे. हे असताना ग्राऊंड रिएॕलिटीचा अभ्यास न करता युजीसी पोरखेळ करत असल्याचा आरोप रोहित ढालेंनी केला आहे.