Join us

दीड लाख मुंबईकरांनी घेतली मतदानाची शपथ; निवडणुकीत टक्केवारी वाढीसाठी उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 10:34 AM

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालय विविध उपक्रम राबवत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालय विविध उपक्रम राबवत आहे. पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून गेल्या आठवड्याभरात जवळपास दीड लाख मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आहे.

उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी चारही लोकसभा मतदारसंघात विविध पातळीवर मतदार जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सामाजिक संदेश-

पालिका पी- दक्षिण अंतर्गत वनराई पोलिस स्टेशनपासून ते वनराई कॉलनी येथे जागृती अभियान फेरी काढण्यात आली. आप्पा पाडा मालाड पूर्व येथे भरारी पथकाने स्वाक्षरी अभियान राबविले. यावेळी नव दाम्पत्यांनी स्वाक्षरी करून ‘आम्ही जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणार’ अशी शपथ घेतली. 

स्वीप अंतर्गत पालिका वांद्रे अनुयोग विद्यालयात रॅली तसेच एच पश्चिम विभागात बचत गटांनी रेल्वे कर्मचारी वसाहत, एफ उत्तर विभागात सायन कोळीवाडा तसेच प्रभात कॉलनी सांताक्रुझ पूर्व येथे निवडणूक प्रतिज्ञा कार्यक्रम घेत मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार केला. 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४