मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे येथे फलाटांच्या विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेला ब्लॉक संपला तरी लोकल प्रवाशांच्या यातना काही कमी झालेल्या नाहीत. लोकल विलंबाने धावणे या एका समस्येला मुंबईकर सामोरे जात नाहीत तर लोकल फेऱ्या वाढविणे, एसी लोकलचे तिकीट कमी करणे, रेल्वे मार्गिका वाढविणे असे अनेक प्रश्न असून एकही लोकप्रतिनिधी त्यावर ब्र काढत नसल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त करत नवनिर्वाचित खासदार तरी लोकलप्रश्नी संसदेत आवाज उठविणार आहेत का, असा सवाल केला आहे.
छावा मराठा संघटनेचे मुंबई अध्यक्ष संदीप पटाडे यांनी मुंबई महानगर प्रदेशातील नवनिर्वाचित खासदारांना पत्र लिहिले आहे. मध्य, हार्बर, पश्चिम आणि ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लोकलचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना होत आहे. गर्दीच्या वेळी लोकल अर्ध्या तासाहून अधिक काळ विलंबाने धावतात. भायखळा, दादर, घाटकोपर रेल्वे स्थानकांवर उभे राहण्यास जागा नाही. लोकल विलंबाने धावत असल्याने गर्दीत प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकल प्रवास जीवावर बेतत असल्याचे संघटनेने नवनिर्वाचित खासदारांच्या लक्षात आणून दिले आहे.
एखाद्या रेल्वे स्थानकावर नवनिर्वाचित खासदार आले म्हणून ते कामाला लागले, असे होत नाही. प्रवासी संघटनांशी त्यांनी संवाद साधला पाहिजे. प्रश्न समजून घेतले पाहिजेत. प्रकल्पांना विलंब का होत आहे? हे समजून घेत संसदेत प्रश्न मांडून तो सोडविला पाहिजे. मात्र एकही लोकप्रतिनिधी या पद्धतीने काम करत नाही, हे दुर्दैव आहे.- मधु कोटीयन, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ
खासदारांनी लोकल, एक्स्प्रेसचे प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनांकडून समजून घेतले पाहिजेत. बैठका घेतल्या पाहिजेत. केवळ लोकल विलंबाने धावण्याचा हा मुद्दा नाही. लोकलफेऱ्या, परवडणाऱ्या एसी लोकल, रेल्वे स्थानकांवरील सेवांचा दर्जा, प्रकल्पांना होणारा विलंब या सगळ्यावर नवनिर्वाचित खासदारांनी बोलले पाहिजे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ
पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य आणि हार्बरची अवस्था वाईट आहे. एकाच शहरात रेल्वेच्या सेवांत दुजाभाव का? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही. नुकत्याच संपलेल्या ब्लॉकनंतर प्रवाशांचे हाल सुरूच होते. मात्र मध्य रेल्वे प्रशासन एक शब्द काढत नव्हते. लोकल प्रवाशांना प्रशासनाने गृहित धरले आहे, असा त्याचा अर्थ होतो. हे अत्यंत चुकीचे आहे.- ॲड. राकेश पाटील, रेल्वे प्रवासी