मान्सूनच्या आगमनाला आता काही दिवसच उरले आहेत. त्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाळ्याचं आगमन झालं की, एखाद्या दिवशी मुसळधार पाऊस पडून रुळांवर पाणी साचून लोकलचा खोळंबा होणं हे दरवर्षीच घडतं. यावर्षी ११ जूनच्या आसपास मुंबईत मान्सून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत विविध सरकारी यंत्रणा आणि रेल्वे मान्सूनपूर्व तयारीमध्ये गुंतली आहे. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात कितीही मुसळधार पाऊस पडला तरी मुंबईतील उपनगरीय लोकल आणि रेल्वेसेवेचा खोळंबा होणार नाही, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.
२०२१ मध्ये मुसळधार पावसामुळे ७ दिवस लोकल सेवेचा खोळंबा झाला होता. विशेषकरून सायन आणि परेल या भागात रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. त्याशिवाय पश्चिम रेल्वेवर माटुंगा रोड, चर्नी रोड आणि ग्रँट रोड या भागात पाणी भरल्याने रेल्वे खोळंबली होती. मात्र यावर्षी मायक्रो-टनलिंक कामं आणि पंप लावण्यात आल्याने २०२१ सारखी परिस्थिती ओढवणार नाही, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. मायक्रो-टनलिंकमध्ये रुळांच्या २-३ मीटर खाली मिनी ड्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. छोटे नाले पर्जन्य जलवाहिन्यांना जोडलेल्या असतात. त्या रेल्वेच्या रुळावरून पाण्याला बाहेर काढतात. त्यामुळे मुसळधार पावसामध्ये अतिरिक्त जलभरण रोखता येते.
दिवा-कळवा, विक्रोळी-कांजूरमार्ग आणि सायन-कुर्ला स्टेशनवर मायक्रो टनलिंकचं काम करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, मुंबईतील पावसाळी संकटाचा विचार केल्यास मायक्रो टनलिंक यशस्वी असल्याचे सिद्ध झाले आहे. ही प्रक्रिया कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आली होती. त्यामुळेच आपल्याला गेल्यावर्षी पाणी तुंबण्याच्या फारशा घटना दिसल्या नाहीत. यावर्षीसुद्धा प्रवाशांना खूप अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच जर पाणी तुंबले तर ते झटपट हटवले जाईल.
मायक्रो-टनलिंकशिवाय आणखी पंप लावण्यात आले आहेत. तसेच नाले आणि त्यांच्या स्वच्छतेसोबत झाडांची कापणी, ढिगारे हटवणे आणि रुळांची उंची वाढवण्याचं काम करणे, आदी कामं करण्यात आली आहेत. तसेच अन्य उपायांबरोबरच रेल्वेकडून एक २४ तास सुरू असणारा नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार मशिद, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परेल, दादर यासह २४ ठिकाणी १६६ पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. मुख्य मार्गावर ८ ठिकाणी मायक्रो टनलिंक करण्यात आली आहे. तसेच उपनगरीय मार्गावर ११८.४८ किमी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला आहे.