११ महिन्यांत मुंबई महानगर क्षेत्रात लोकलमधून पडून ५०२ जणांचा मृत्यू, कल्याण रेल्वे स्थानकात सर्वाधिक ९६ मृत्यू
By नितीन जगताप | Published: December 2, 2023 08:23 AM2023-12-02T08:23:05+5:302023-12-02T08:23:44+5:30
Mumbai Suburban Railway: लोकलगाड्यांना मुंबईची जीवनरेखा म्हटले जाते. दररोज ७५ लाख प्रवासी लोकलच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांत प्रवास करतात. मात्र, गेल्या ११ महिन्यांत मुंबई महानगर क्षेत्रात लोकलमधून पडून ५०२ जणांनी जीव गमावल्याचे निदर्शनास आले आहे.
- नितीन जगताप/अनिकेत घमंडी
मुंबई/डोंबिवली : लोकलगाड्यांना मुंबईची जीवनरेखा म्हटले जाते. दररोज ७५ लाख प्रवासी लोकलच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांत प्रवास करतात. मात्र, गेल्या ११ महिन्यांत मुंबई महानगर क्षेत्रात लोकलमधून पडून ५०२ जणांनी जीव गमावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही कल्याण स्थानकात सर्वाधिक ९६ मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोविडनंतर पाच लाखाने प्रवासी संख्या कमी झाली तरीही रेल्वे प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण आणता येत नसल्याचे चित्र आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ११ महिन्यांत ५०२ लोकांचे बळी केवळ गाडीतील गर्दीमुळे पडून गेले. उर्वरित १८५२ मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना खांबाला आदळल्याने आणि इतर कारणांनी झाल्याचे समोर आले आहे. अपघात होऊ नयेत, तसेच प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अनेक उपाययोजनांचा दावा केला जातो. मात्र शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात सर्वाधिक ९६ पडून मृत्यू झाले आहेत. यास पायाभूत सुविधा नसणे आणि घोषणांचा गोंधळ कारणीभूत आहे. कल्याण स्थानकात एका फलाटावर लोकलचे इंडिकेटर दिसते आणि लोकल दुसऱ्या फलाटावर येण्याची घोषणा होते. एक्सलेटर आणि लिफ्ट अपुऱ्या आहेत त्यामुळेही प्रवाशांची धावपळ होते.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ
कल्याण-डोंबिवली लोहमार्ग हद्दीत आतापर्यंत शेकडो अपघाती मृत्यू झाले असून, तेवढेच जखमीदेखील झाले आहेत. प्रवाशांनी गर्दीचा प्रवास टाळावा. रूळ ओलांडू नये. दरवाजात उभे राहू नये. कानात हेडफोन लावून प्रवास करू नये. प्रवासात सतर्क असावे.
- अर्चना दुसाने,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
कल्याण-डोंबिवली जीआरपी
वेळेपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे. रेल्वेने घोषणा करूनही प्रवासी दुर्लक्ष करतात. प्रवाशांनी गर्दीने खच्चून भरलेल्या गाड्यांतून प्रवास करणे टाळावे.
- मनोज पाटील,
उपायुक्त, मध्य रेल्वे