Join us

मुंबई उपनगरीय रेल्वेची तिजोरी रिकामीच

By admin | Published: April 21, 2017 1:05 AM

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून दिली जात असली तरी प्रत्यक्षात रेल्वेची तिजोरी रिकामीच अ..

सुशांत मोरे , मुंबईमुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून दिली जात असली तरी प्रत्यक्षात रेल्वेची तिजोरी रिकामीच असल्याचे समोर आले आहे. २००९-१० या वर्षांची यंदाच्या आर्थिक वर्षासोबत तुलना केल्यास उत्पन्नात ४२२ कोटी तर तोट्यात ९५१ कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे तोट्यातील रेल्वे चालवताना बरीच कसरत करावी लागत आहे. मुंबईचा उपनगरीय लोकलचा पसारा हा पश्चिम, मध्य रेल्वे मेन लाईन व हार्बरवर आहे. या तिन्ही मार्गावरुन दिवसाला ७५ ते ८० लागांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. जवळपास २,९०० पेक्षा अधिक लोकल फेऱ्या या मार्गांवर होतात. यातून रेल्वेला प्रत्येक वर्षी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. मात्र त्यापेक्षा मुंबईतील रेल्वेतून खर्चच जास्त होतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. २००९-१० मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेतून १ हजार १६८ कोटी उत्पन्न प्राप्त झाले होते. २०१५-१६ मध्ये ते १ हजार ५९० कोटी रुपयांपर्यंत गेले. खर्चही २०१५-१६ साली ३ हजार १०८ कोटी झाला असून २००९-१० मध्ये हाच खर्च १ हजार ७३५ कोटी रुपये झाला. एकंदरीतच २००९-१० आणि २०१५-१६ मधील तुलना केल्यास तोटाच अधिक असल्याचे दिसून येते. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात रेल्वेचे प्रकल्प सुरु आहेत. उत्पन्न जास्त नसल्याने आता या या प्रकल्पांसाठी निधी उभारायचा कसा, यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाय शोधत आहे. (प्रतिनिधी)