Join us

परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 9:10 AM

उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

मुंबई :मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोबतच नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

२३ सप्टेंबरपासून राजस्थान व कच्छ परिसरातून वातावरणीय बदलानुसार मान्सून परतण्याची शक्यता आहे. मान्सूनने जरी तोंड फिरवले तरी इतर काही वातावरणीय घडामोडीतून तो सुरुवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

या कालावधीत २२ पासून २४ सप्टेंबरपर्यंत प्रथमत: विदर्भात जोरदारपणे व त्या नंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, खान्देश व नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत किरकोळ हलका पाऊस पडेल. २६, २७ सप्टेंबरला खान्देश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व सभोवतालातील परिसरात व २८, २९ सप्टेंबरला मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

 २६ ते २९ सप्टेंबर या दिवसांत नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर- पाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :मुंबईठाणेपालघरपाऊस