मुंबई - ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवस मुंबई आणि परिसरात कृपावृष्टी केल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांतील पाणीसाठ्यात ४० हजार ५२६ दशलक्ष लिटरने वाढ झाली. दोन दिवसांत तब्बल २२ दिवसांच्या साठ्याची वाढ झाली आहे. त्यामुळे मे २०२४ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातही धरणांत एकूण ९६.७९ म्हणजेच १४ लाख ९६८ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पुढील ३६१ दिवस पुरणार आहे.
मुंबईला पावसाळा संपल्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पुढील वर्षभरासाठी सात तलावांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. तरच वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करणे शक्य होते. साठा कमी असल्यास किमान १० टक्के ते १५ टक्के इतकी पाणीकपात करावी लागते. सध्या सात तलावांतील पाणीसाठा मे २०२४ पर्यंत पुरेसा इतका जमला असल्याने मुंबईवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सातही धरणातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर गेला आहे. पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळणार, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अद्यापही सप्टेंबरमधील तीन आठवडे शिल्लक आहेत. या कालावधीत आणखी चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा हे तीन तलावसुद्धा भरून वाहिल्यास मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. यापूर्वी जुलैमध्ये तानसा, मोडक सागर, तुळशी आणि विहार हे चार तलाव भरून वाहू लागले होते.