शेतकऱ्यांच्या हाकेला मुंबईची साथ, भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:17 AM2020-12-09T03:17:57+5:302020-12-09T03:18:16+5:30
Mumbai News : केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी व कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मालाड काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
मुंबई - केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी व कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मालाड काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
यावेळी अस्लम शेख म्हणाले की, केंद्र सरकारने मंजूर केलेले हे तीन कायदे शेतकऱ्यांना स्वत:च्याच भूमीत मजूर बनवणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.
‘करार शेती’चे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले, ते सर्व फसल्याची उदाहरणे ताजी असताना, पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी ‘करार शेतीचा’ घाट घातला जातो आहे. १९५५च्या अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून बड्या कंपन्यांना साठेबाजीसाठी केंद्र सरकारने रान मोकळे करून दिले, अशी टीका त्यांनी केली.
मुलुंड, घाटकोपर बंद; चेंबूर येथे धरणे आंदोलन
n कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर दिला. आज गोरेगाव रेल्वेस्थानकाजवळ फेरीवाला सेना व हॉकर्स संघटनेसह विविध पक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी एकत्र येत कृषी कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणांनी गोरेगाव स्थानक दणाणून सोडले.
n शेतकऱ्यांचा विरोध असणाऱ्या आणि
भांडवलदारांना मदत करणाऱ्या कायद्याचा नेहमीच विरोध केला जाईल व सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी शिवसेना नेहमीच उभी असेल, असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी केले. मुलुंड, घाटकोपर येथे बंद पाळण्यात आला. येथे पदयात्रा, बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चेंबूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
अंधेरीत निदर्शने
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी बिलाविरोधात अंधेरी पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेर निदर्शने करण्यात आली. अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस व माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्षांनी संयुक्तपणे ‘भारत बंद’ आंदोलन पुकारले आणि केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आला. यावेळी सदर काळा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.