Mumbai: ताई, तू फक्त हिंमत कर; पोलिस आहे मदतीला, तक्रारदारासाठी उभारला स्वागत कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:22 PM2023-04-18T12:22:16+5:302023-04-18T12:22:30+5:30
Mumbai Police: पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला चांगली वागणूक मिळावी यासाठी पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. दुसरीकडे, महिलांसाठी निर्भया पथक २४ तास कार्यरत आहे.
मुंबई : पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला चांगली वागणूक मिळावी यासाठी पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. दुसरीकडे, महिलांसाठी निर्भया पथक २४ तास कार्यरत आहे.
मुंबईत दिवसाला हजारो तक्रारी पोलिस ठाण्यात येतात. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला तक्रार करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ९४ पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष उभारण्यात आले. यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. मुंबईत काही ठिकाणी प्रशस्त असा कक्ष तयार करण्यात आला आहे. काही पोलिस ठाण्यात टेबलला स्वागत कक्षाचा बोर्ड लावून तेथे मार्गदर्शन करतात.
क्यूआर कोडचा धाक...
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर, मुंबईत निर्भया पथकाची स्थापना केली. तसेच, मुंबईतल्या महिलांसंबंधित घडलेल्या गुह्यांच्या आधारावर निर्जनस्थळी, धोकादायक अशी ठिकाणे निवडून त्याठिकाणी क्यूआर कोड लावून गस्तीवर भर देण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात अशी ३० ते ४० ठिकाणी असून, त्यानुसार हे पथक साध्या गणवेशात छुप्या कॅमेऱ्यांसह टवाळखोरांवर लक्ष ठेवून राहतात.
पोलिसांकडून प्रत्येक निर्जनस्थळी तसेच संवेदनशील ठिकाणी लावलेल्या क्यूआर कोड ठिकाणी जाऊन मोबाइलमध्ये असलेल्या ॲपमधून स्कॅन करावे लागते. पुढे, याबाबत दिवसाचा अहवाल पोलिस उपायुक्त परिमंडळकडे दिला जातो. तेथून, प्रादेशिक विभागाकडून एकत्रित तपशिलासह आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांच्याकडे पाठविला जातो. त्यामुळे त्या भागात किती जणांनी किती वेळा स्कॅन केले याबाबतची माहिती मिळते आणि क्यूआर कोडचा धाकही परिसरात पहावयास मिळतो.