Join us

मुंबईत टॅक्सी, रिक्षाच किफायतशीर !

By admin | Published: November 25, 2014 12:33 AM

कूल कॅब वाहनांनी घरपोच सेवा देत जरी स्पर्धा निर्माण केली असली तरी आर्थिकदृष्टय़ा परवडणा:या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षा आजही प्रवाशांच्या मनात घर करून आहेत.

भाडे नाकारणो, भाडे ज्यादा घेणो आणि महत्त्वाची बाब म्हणजे गरज असेल त्या वेळी वाहन उपलब्ध न होणो या आणि अशा अनेक कारणांमुळे मुंबई शहर आणि उपनगरांत धावणा:या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांचा प्रवास नकोसा होतो. परंतु कूल कॅबसारख्या खासगी कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांनी आडमुठी भूमिका न घेता आता चांगलीच सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कूल कॅब वाहनांनी घरपोच सेवा देत जरी स्पर्धा निर्माण केली असली तरी आर्थिकदृष्टय़ा परवडणा:या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षा आजही प्रवाशांच्या मनात घर करून आहेत. आर्थिकदृष्टय़ा आणि अन्य सोयी-सुविधांबाबतीत या वाहतूक सेवा मुंबईकरांसाठी किती किफायतशीर आहेत याचा ‘लोकमत’चे प्रतिनिधी सुशांत मोरे  आणि सायली कडू  तसेच छायाचित्रकार दत्ता खेडेकर  आणि विजय बाटे  यांनी दादर (प्लाझा) ते अंधेरी पूर्व स्थानक असा ओला कॅब, मेरू कॅब आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने तर बोरीवली पूर्व स्थानक ते वांद्रा पूर्व स्थानक असा रिक्षा व ओला कॅबने प्रवास करीत घेतलेला आढावा़़़
 
रविवारी सकाळी साडेदहा वाजता ओला कॅब टॅक्सी त्यांच्या कॉल सेंटरवर फोन करून मागवल्यानंतर चालक शशिकांत अंधेरी पूर्व स्थानकाबाहेर असणा:या बेस्ट डेपोजवळ टॅक्सी घेऊन आला. दादर प्लाझाला जायचे असल्याचे सांगताच सकाळी 10.40च्या सुमारास या एसी गाडीतून प्रवास सुरू झाला. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून खार, वांद्रा, माहीम चर्च करीत टॅक्सी 11.05च्या सुमारास प्लाझाजवळ पोहोचली. 12.8 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर या टॅक्सीचे भाडे 268 रुपये झाले आणि हे बिल अदा करीत आम्ही प्लाझाजवळच बुक केलेल्या मेरू टॅक्सीची वाट पाहू लागलो. ओला कॅबचे पहिल्या 7 किलोमीटरसाठीचे कमीत कमी भाडे 150 रुपये असून, त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे लागते. टॅक्सीचालकाला भाडे दिल्यावर त्याची पावती आपल्याला मिळत नाही. कंपनीकडून टॅक्सीतच बसवलेल्या मोबाइल ट्रॅक आणि जीपीएस यंत्रणोत बिल दिसते.
 
याआधी मी गॅरेजमध्ये काम करीत होतो. चांगली कमाई करायची असल्याने कॅबचा चालक झालो. यातून उत्पन्न चांगले मिळते. ही कॅब चालवण्यापूर्वी कशी यंत्रणा असते, याचे प्रशिक्षण आम्हाला दिले जाते. या प्रशिक्षणामुळे प्रवाशांशी सौजन्याने कसे वागावे हे समजले. दिवसाला दोन ते तीन हजार रुपयांचे टार्गेट आहे. यामधून आम्हाला कमिशन मिळते.
- शशिकांत (ओला कॅब - चालक) 
 
11.05 च्या सुमारास ओला कॅब प्लाझाजवळ पोहोचण्यापूर्वी 5 मिनिटे अगोदर मेरू कॅबची बुकिंग त्यांच्या कॉल सेंटरवर फोन करून केली आणि प्लाझाजवळ 11.15 वाजता तत्काळ मेरू कॅब टॅक्सी पाहिजे असे सांगितले. 11.20र्पयत टॅक्सी येईल, असे सांगिल्यानंतर प्रत्यक्षात टॅक्सी 11.10 वाजताच आली आणि टॅक्सीचालक इश्ताक अहमद याने फोन करून टॅक्सी आल्याची माहिती फोनवर दिली. आमचा याच मार्गावरून पुन्हा उलट प्रवास सुरू झाला. दादर ते माहीम प्रवासात असलेल्या ब:याच सिग्नलमुळे प्रवास थोडा मंदावत होता. माहीम सोडल्यानंतर वांद्रा येथील पुलावरून चालकाने वाहनाचा वेग वाढवला. ओला कॅबने ज्या मार्गावरून प्रवास सुरू केला त्याच मार्गावरून पुन्हा प्रवास करीत मेरू टॅक्सी अंधेरी पूर्व स्थानकाजवळ सकाळी 11.40 वाजता पोहोचली. त्यावेळी या टॅक्सीचे भाडे जवळपास 267 रुपये झाले. 13 रुपये सव्र्हिस टॅक्स असल्याने एकूण बिल 280 रुपये अदा करावे लागले त्याची पावती मिळाली.
 
याआधी काळी-पिवळी टॅक्सी चालवत होतो. चार वर्षे ही कॅब चालवत आहे. उत्पन्न चांगले आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून कमाई कमीच होत होती. तसेच टॅक्सीत अस्वच्छता, प्रवाशांशी वाद अशा समस्या होत्या. आता तसे नाही. प्रवाशांशी सौजन्याची वागणूक असतेच, पण येणारे प्रवासीही चांगले असतात. ही कॅब चालवताना आरामही मिळतो. 
                                           - इश्ताक अहमद (मेरू कॅब - चालक)
 
ओला आणि मेरू कॅबचा सुखद प्रवास अनुभवल्यानंतर काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करण्यासाठी आम्ही टॅक्सी शोधू लागलो. अंधेरी स्थानकाबाहेर रांगेत या टॅक्सी उभ्या असल्याने दादर जाणार का, अशी विचारणा केली असता दोन टॅक्सीचालकांनी नकार दिला. त्यानंतर तिस:या टॅक्सीचालकाला विचारताच ‘दादर्पयतच्या प्रवासासाठी 250 रुपये घेणार,’ असे त्याने सांगितले. मात्र मीटरने प्रवास करायचा आहे, असे सांगितल्यावर चालकाने नकारच दिला. अखेर 1क् मिनिटे टॅक्सी मिळवण्यासाठी गेल्यावर सकाळी 11.55च्या सुमारास एक रमेश आदव नावाचा टॅक्सीचालक दादरला जाण्यास तयार झाला. एअरपोर्ट, खार, वांद्रा, माहीम चर्चर्पयत अवघ्या 15 मिनिटांत टॅक्सी आली. मात्र त्यानंतर असलेले सिग्नल आणि वाहनांची गर्दी यामुळे पुढील प्रवास रेंगाळत झाला. तोर्पयत टॅक्सीचालकाशी संवाद साधत तुम्ही चालकाचा ड्रेस का नाही घातला, अशी विचारणा केली. तर मी या गाडीचा चालक नसून दुसरा एक जण चालक असल्याचे त्याने सांगितले. मी दुसरीकडे खासगी वाहन चालवतो आणि 12 हजार रुपये महिन्याला पगार मिळतो. फक्त रविवारी वरकमाईसाठी टॅक्सी चालवतो. दुपारी 12.25च्या सुमारास ही टॅक्सी प्लाझाजवळ पोहोचली. या टॅक्सीचे भाडे पाहिले असता 12.70 किलोमीटरच्या प्रवासासाठी 187 रुपये अदा करावे लागले. एकाच मार्गावरून प्रवास करताना कूल कॅबपेक्षा काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे भाडे जरी कमी असले तरी ही टॅक्सी मिळवण्यासाठी मिळणारा नकार, आसनव्यवस्था, अस्वच्छता पाहता कूल कॅब बरी वाटली.
 
खासगी वाहन चालवत असून, महिन्याला 12 हजार रुपये पगार मिळतो. मात्र आणखी कमाई करण्यासाठी रविवारी दुस:याची टॅक्सी चालवतो. आराम मिळत नाही, तसेच कमाई करूनही ती पुरत नाही. रविवारी टॅक्सी चालवून साधारण 500 ते 1 हजार रुपये मिळतात. 
- रमेश आदव (काळी-पिवळी टॅक्सीचालक)
 
बोरीवली स्थानकाच्या पूर्वेपासून रिक्षा आणि ओला कॅबने एकाच वेळेत प्रवास करण्यास सोमवारी सकाळी 10.50च्या सुमारास सुरुवात झाली. रिक्षाचालक वांद्रा येथे जाण्यास तयार झाला. तर वेळेवर आलेला ओला कॅबचा चालकही तयारीतच होता. बोरीवली पूर्व, ठाकूर संकुल, म्हापसा पाडा, कुरार व्हिलेज असा प्रवास रिक्षा आणि टॅक्सीने करीत 11.35च्या सुमारास वांद्रा पूर्व स्थानकाजवळ पोहोचलो. वांद्रात पोहोचल्यावर रिक्षाचे भाडे 262 रुपये तर ओला कॅबचे भाडे 490 रुपये झाले. एकाच अंतरावर केलेल्या या प्रवासांत दोन्ही वाहतूक सेवांचे भाडे पाहता  रिक्षा ही परवडणारी वाटते. 
 
उत्पन्न मिळते. पण कमी. तरीही जास्तीतजास्त प्रवासी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यासाठी त्यांच्याशी सौजन्याने वागणो आणि चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहतो. 
- सुरेश कदम (रिक्षाचालक)