Join us

अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 4:20 PM

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. २६ जूनला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून १ जुलैला निकाल लागतील. 

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठेची लढाई केली आहे. या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघात मनसेचीही ताकद आहे. महायुतीचा घटक म्हणून शिवाजी नलावडे यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर शिवाजी नलावडे म्हणाले की, आमचे जुने सहकारी माजी मंत्री बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या सोबत मी राजसाहेबांची भेट घेतली. त्यांना मतदारसंघाबाबत संपूर्ण कल्पना दिली. मैदानात कोण कोण आहे त्याबाबत विस्तृत चर्चा झाली. मी राजसाहेबांचा जुना सहकारी आहे. या निवडणुकीत मी कसा निवडून येऊ शकतो याची कल्पना  त्यांना आहे. त्याची दखलही त्यांनी घेतली. याबाबत ते त्यांच्या पक्षातील संबधित नेते, पदाधिकाऱ्यांना आदेश देतील आणि व्यूहरचनेचा भाग बनण्याबाबत चर्चा झाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ही निवडणूक चिन्हावर नसली तरी महायुती जरूर आहे. महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत त्या सर्वांमध्ये एबी फॉर्म दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचं नेतृत्व अजित पवार करतायेत. त्याचा मी एकमेव उमेदवार आहे. मला राज ठाकरेंचा पाठिंबा नक्की मिळणार आहे. मी साहेबांना विनंती केली आहे. या निवडणुकीबाबत त्यांचा निर्णय ते त्यांच्या पदाधिकारी, नेत्यांना कळवतील असा विश्वास शिवाजी नलावडे यांनी व्यक्त केला. 

मुंबई, नाशिक येथील २ शिक्षक आणि कोकण, मुंबई पदवीधर मतदारसंघातील २ अशा ४ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. येत्या २६ जूनला या जागांवर मतदान होईल आणि १ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल. मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो अभ्यंकर यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार कपिल पाटील यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्याऐवजी शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते हे १ जुलैच्या निकालात कळेल.  

टॅग्स :विधान परिषद निवडणूकराज ठाकरेअजित पवारमनसेउद्धव ठाकरे