मुंबई : पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत. हे अतिशय धक्कादायक असून, नवीन रस्त्यांच्या कामाच्या डेडलाइन सांगा. याबाबत पालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण द्यावे, असे ट्वीट करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनावर आणि सरकारवर निशाणा साधला आहे.
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतील लहान-मोठ्या सर्व नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने आणि योग्यरीतीने करणे, रस्त्यांची कामे जलद गतीने करणे, विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक होते, मात्र अद्यापही ही सर्व कामे संथ गतीने सुरू असून, विशेषतः रस्ते आणि पुलांची कामे ठप्प असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले असून, परिणामी रस्ते, पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, एकीकडे भ्रष्ट प्रशासन व सरकार मलिदा खात आहे तर दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत असल्याचे अधोरेखित करत पालिका प्रशासनाने याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
डिलाइल रोड पुलाची पाहणीवरळीतील डिलाइल रोड पुलाला आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. रेल्वेमुळे उशीर झालेल्या पुलाची पूर्णता आता पालिका करत आहे; पण खडीच्या टंचाईमुळे या पुलाच्या कामाला आणखी उशीर होणार असल्याने या विषयावर पालिकेकडून उत्तर अपेक्षित असल्याचे ट्वीट आदित्य यांनी केले आहे. या आधीही लूट सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची घोषणा करून ५ हजार कोटींच्या निविदा काढल्या. मात्र, प्रतिसाद न आल्याने ६ हजार ८० कोटी रुपयांच्या निविदा जाहीर केल्या. यात कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आल्याचा असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.