Join us

तापमान बदलाने मुंबईकर झाले त्रस्त, कमाल तापमान ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:53 AM

मुंबई : तब्बल चार महिने झोडपलेल्या मान्सूनने आज अखेर (२४ आॅक्टोबर) मुंबईसह महाराष्ट्रातून एक्झिट घेतली असतानाच वाढत्या आॅक्टोबर हिटने मात्र मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

मुंबई : तब्बल चार महिने झोडपलेल्या मान्सूनने आज अखेर (२४ आॅक्टोबर) मुंबईसह महाराष्ट्रातून एक्झिट घेतली असतानाच वाढत्या आॅक्टोबर हिटने मात्र मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मंगळवारी मुंबई शहराचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले असून, वाढत्या उन्हासह उकाड्याने मुंबई हैराण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आॅक्टोबर हिटचा तडाखा दिवसागणिक वाढतच असून, मान्सूनने एक्झिट घेतल्यानंतर हिटचा फटका अधिकच बसणार आहे.मंगळवारी पारा ३५ अंश नोंदविण्यात आला असतानाच दिवसभर येथे कडाक्याचे ऊन पडले होते. शिवाय आर्द्रताही कमी अधिक फरकाने ८० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात आल्याने उकाड्याचा घाम निघतच आहे. दरम्यान, मागील आठवड्याभरापासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. यात दोन दिवसांपूर्वी घट झाली; आणि कमाल तापमान ३२ अंशावर घसरले. यास काही तासांचा कालावधी उलटत नाही तोवर कमाल तापमानाने पुन्हा उसळी घेतली आहे. कमाल तापमान थेट ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. परिणामी, मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. यात आता उत्तरोत्तर वाढच होणार असून, वाढती आॅक्टोबर हिट मुंबईकरांना चांगलाच घाम फोडणार आहे.