मुंबई : तुफान पावसाने गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासूनच मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाला सुरुवात झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात रौद्ररूप धारण केले. तर ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. राज्यातही पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले. विदर्भात वीज पडून ३१ महिला जखमी झाल्या. बहुतांशी जिल्ह्यांत संततधार पाऊस झाला असून, शुक्रवारी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्याच्या काही भागांत मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४८ तास मुसळधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजळी आणि बाव नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, जगबुडी, शास्त्री, कोदवली आणि मुचकुंदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा (चांदोली) धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि सातारा, गाेंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ठाणे : दोघे बुडाले; एकाचा मृतदेह हाती
ठाण्यात दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये दाेघे जण बुडाले. बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चिराग जोशी (१९) याचा मृत्यू झाला. तर खाडीकिनारी मासे पकडताना रमेश लिंगप्पा टेकी (४५) हे बुडाले. त्यांचा शोध लागलेला नाही.
पालघर : १२ गावांचा संपर्क तुटला
डहाणू तालुक्यात झालेला मुसळधार पाऊस आणि धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांना पूर येऊन महामार्गालगतच्या १२ गावांचा संपर्क तुटला आहे. सूर्या प्रकल्पातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले धामणी धरण ९७.५१ टक्के भरले असून धामणी धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडले आहेत. धामणी आणि कवडास धरणामधून पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे.
डहाणू : बोट उलटून मच्छीमाराचा मृत्यू
वादळी वाऱ्यात छोटी बोट घेऊन मासेमारीला गेलेल्या दोन तरुण मच्छीमारांपैकी भूपेंद्र किशोर अंभिरे (वय ३४) यांचा डहाणूजवळ समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुसरा मच्छीमार पोहत किनाऱ्यावर पोहोचला.
द्रुतगती मार्गावर दरड कोसळली
पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ गुरुवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली. मार्गावरील अन्य एक मार्गिका खुली असल्याने वाहतुकीवर त्याचा काही परिणाम झाला नाही.
सरासरीच्या १०४% पाऊस
संततधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.
यवतमाळला पुन्हा पूरस्थिती
गुरुवारी सकाळीही पावसाने झोडपल्याने यवतमाळसह जिल्ह्यातील राळेगावसह कळंब, वणी, घाटंजी आदी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून ३१ महिला जखमी झाल्या.