डोंबिवली: शहरातील बस स्थानक एमआयडीसीला एका कोप-यात असल्याने इच्छा असूनही अनेकांना एसटीचा लाभ घेता येत नाही. त्या उलट खासगी टुर्स-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे व्यावसायिक त्यांच्या बस पूर्वेला मानपाडा रस्ता, टिळकपथ आदी परिसरात आणतात. त्यातच राज्य परिवहनने ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर सुरु केलेली डोंबिवली-पुणे बससेवा अवघ्या दोन महिन्यात बंद केली. पण आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरु केलेली ‘शिवशाही’ सुविधा ही जशी मुंबईसह ठाणेकरांना मिळणार आहे तशीच डोंबिवलीकरांसाठीही हवी अशी मागणी कल्याण-डोंबिवली परिवहनचे माजी सभापती भाऊ चौधरी यांनी केली आहे.परवडत नसतांनाही येथिल शेकडो नागरिक डोंबिवली-पुणे-डोंबिवली नीत्याचा प्रवास करतात. विशेषत: त्यात ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी, युवकांचा समावेश जास्त आहे. राज्य परिवहनची सेवाच नसल्याने अनेकांना रेल्वे स्थानक ते पनवेल आणि त्यानंतर कळंबोली अथवा पनवेल-पुणे असा प्रवास करावा लागतो. यामध्ये वेळ जात असल्याने खासगी बसने थेट पुण्याला जाण्याकडे नागरिकांची पसंती आहे.रोज सकाळी ७.३० वाजता खासगी बस तेथे जातात. परिवहनने डोंबिवली-पुणे ही बस सकाळी ७ वाजता बाजपीप्रभु चौकातून सोडण्याचा निर्धार केला होता. विठ्ठलवाडी आगारातून ती बस येथे यायची. शुभारंभापासूनच विविध कारणांमुळे ती बस कधीही ७ वाजता आली नाही. ती नेहमी साडेसात नंतरच यायची, त्यानंतरही पुण्याला जाण्यासाठी त्या बसने गेल्यास दुपार व्हायची. त्यातुलनेत खासगी बसेस अवघ्या अडीच-तीन तासात पुण्याला सोडत असल्यानेही प्रवाशांची नाराजी होती. त्यातच खासगी बस आणि परिवहनची सुविधा यांच्या डोंबिवलीतून सुटण्याच्या वेळा सारख्याच पण पुण्यात जाण्याच्या वेळांमध्ये दोन तासांचा फरक होता, परिणामी परिवहनच्या सुविधेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. * आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरु केलेली ‘शिवशाही’ ही वातानुकूलीत बससुविधा डोंबिवलीकरांसाठीही सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे. ठाण्यासाठी रावतेंनी १४ शिवशाही बस देणार असल्याचे सांगितले, त्यापैकी दोन लवकरच ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. त्याच धर्तीवर डोंबिवलीकरांसाठी निदान प्रायोगिक तत्वावर तरी ‘शिवशाही’ची एक बस सुविधा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
डोंबिवलीमध्ये पुण्याला जाणारे असंख्य प्रवासी आहेत, त्यामुळे त्यांना ‘शिवशाही’ची सुविधा मिळावी यासाठी निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. परिवहन मंत्री रावतेंची त्यासाठी भेट घेणार - राजेंद्र देवळेकर, महापौर.