मुंबई, ठाण्याच्या मंडळांची पूरग्रस्तांसाठी घागर उताणी; मदतीसाठी आयोजक सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 05:30 AM2019-08-24T05:30:58+5:302019-08-24T09:32:13+5:30
काही मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. सर्वसामान्यांकडून या निर्णयाबाबत मंडळांचे कौतुक केले जात आहे.
मुंबई : यंदा मुंबई प्रमाणेच ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपली निधीची घागर उताणी करण्याचा निर्णय घेत, यंदा काही बड्या मंडळांनी दहीहंडीचे आयोजन रद्द केले आहे. असे असले, तरी मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नाही.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीच्या आयोजनातही राजकीय चुरसही दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या आकड्यानुसार मुंबईच्या शहर आणि उपनगरात सुमारे ३,३३0 गोविंदा मंडळांची नोंद झालेली आहे.
दहीहंडी उत्सवाला गालबोट लागू नये, म्हणून मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. उत्सवासाठी उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देत, गोविंदांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सहभागी होत सर्व स्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. यासाठी पोलिसांना शहरातील पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवरची मदत होणार आहे. मुंबई पोलीस दलातील ४० हजार अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय व राज्य राखीव बल, दंगल नियंत्रण पथक, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्बशोधक व नाशक पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. उत्सवासाठी विमा काढणाऱ्या मंडळाची संख्या १,१६१ इतकी आहे.
ठाण्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, संकल्प, संस्कृती युवा प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोज, मनसेप्रणितसह बहुतेक मंडळांनीही यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. सर्वसामान्यांकडून या निर्णयाबाबत मंडळांचे कौतुक केले जात आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि शालेय शिक्षण विभागामार्फत शाळा व महाविद्यालयांना
सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी टिष्ट्वटद्वारे ही माहिती दिली आहे.
बड्या आयोजकांचा गोपाळकाला रद्द
कालिदास कोळंबकर आयोजित हंडी, अरुण दुधवडकर यांचा एसी मार्केटमध्ये होणारा उत्सव, गिरगावमध्ये पांडुरंग सकपाळ यांचा गोपाळकाला रद्द करण्यात आला आहे. तसेच घाटकोपरचे आमदार आमदार राम कदम, मागाठाण्यातील आमदार प्रकाश सुर्वे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे यांनीही दहीहंडी आयोजन रद्द केले आहे. कुर्ला, दादर, घाटकोपर, बोरीवली, चारकोप, गिरगाव या भागातही दहीहंडी परवानगी अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.