Join us

मुंबई, ठाणे, नवी मुंबईचे होतेय वाळवंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:05 AM

१७ जून; जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिवस विशेष; राज्यातील ३० टक्के भागाला ओल्या, कोरड्या दुष्काळाशी करावा लागताे सामनासचिन ...

१७ जून; जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिवस विशेष; राज्यातील ३० टक्के भागाला ओल्या, कोरड्या दुष्काळाशी करावा लागताे सामना

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरांचेही काँक्रिटीकरणासह रस्ते, विकास, उद्योगांमुळे वाळवंटीकरण होत असून, याला हिट आयलँड असे संबोधले जाते. काँक्रिटीकरणामुळे शहरातील तापमान आणि वाळवंटातील तापमान एकसारखे नोंदविण्यात येत आहे. कारण, काँक्रिटीकरणामुळे तापमानात वाढ होत असून, तापमान वाढीमुळे अतिवृष्टी होते. परिणामी, मुंबईसारखी महानगरेही वाळवंटाच्या दिशेने जात आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील ३० टक्के भाग हा आजही ओल्या आणि कोरड्या दुष्काळाशी सामना करत आहे.

मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड आणि हवामान बदल हे दोन घटक यास प्रामुख्याने कारणीभूत आहेत, असे या विषयावर सखोल अभ्यास करत असलेले पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. अधिक माहिती देताना चोपणे म्हणाले की, मराठवाड्यांत जंगल होते. लोकांनी शेतीसाठी जंगले तोडली. परिणामी, आज सर्वात जास्त वाळवंटीकरण महाराष्ट्रात मराठवाड्यात झाले आहे. यामागे कमी पाऊस हे नैसर्गिक, तर जंगलतोड हे मानवनिर्मित कारण आहे. आता तेथे तापमान जास्त असल्याने अडचणी आणखी वाढत आहेत. येथे मान्सूनपेक्षा परतीचा पाऊस जास्त पडतो. बऱ्याचदा येथे ढगफुटी होते. कमी दाबाचे निर्माण हाेणारे क्षेत्र हे वादळ पाऊस किंवा ढगफुटीस कारणीभूत आहे. समुद्र किनारी असलेला भाग, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र येथे ओला दुष्काळ आहे. येथे अतिपावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पीकपाणी होत नाही. याचे कारणही तापमानवाढ आहे. यास शहरीकरणही कारणीभूत आहे.

* वृक्ष लागवड करणे गरजेचे!

चाेपणे यांनी सांगितले की, निसर्गात जंगल आणि वाळवंट असे दोन भाग असतात. आता शहरीकरणामुळे शहरांचेही वाळवंटीकरण झाले आहे. शहरांचे तापमान वाढू लागले आहे. शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याचे वाळवंटीकरण होत आहे. वाळवंटात वाळू असते. शहरांत काँक्रीट आहे. एवढाच काय तो फरक आहे. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

..................................