मुंबई, ठाणे, नवी मुंबईची बत्ती गूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:20 AM2018-06-02T06:20:52+5:302018-06-02T06:20:52+5:30
महापारेषणच्या कळवा ग्रहण केंद्राच्या उपकेंद्रामध्ये शुक्रवारी पहाटे दीड वाजता ट्रान्सफॉर्मरमुळे झालेल्या बिघाडाने आग लागल्याची घटना घडली
मुंबई /ठाणे / नवी मुंबई : महापारेषणच्या कळवा ग्रहण केंद्राच्या उपकेंद्रामध्ये शुक्रवारी पहाटे दीड वाजता ट्रान्सफॉर्मरमुळे झालेल्या बिघाडाने आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील ठिकठिकाणाचा वीजपुरवठा खंडित झाला. ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग विझविण्याचे काम उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबई शहरातील बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रिलायन्स, टाटा आणि महावितरणच्या वीज ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला. नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे येथून वीजपुरवठा होणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, मुलुंड परिसरातील ग्राहकांना पुढील एक ते दीड महिना ‘भारनियमना’ला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी, नागरिक वाढता उकाडा आणि बत्ती गूल झाल्याने चांगलेच घामाघूम होणार आहेत.
महापारेषणकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४०० के.व्ही. ग्रहण केंद्र, कळवा, उपकेंद्रामध्ये शुक्रवारी पहाटे दीड वाजता ६०० एम.व्ही.ए.च्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर)मध्ये युनिट दोनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे आग लागून ट्रान्सफॉर्मर एकच्या केबलचेही नुकसान झाले. परिणामी, दोन्ही युनिट नादुरुस्त झाले. ट्रान्सफॉर्मर एकची केबल पूर्ववत करणे आणि ट्रान्सफॉर्मर दोनचे जळालेले युनिट बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. युनिट एक कार्यरत करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोन सुरू करण्यासाठी तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी, या कालावधीत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरांत काही ठिकाणी गरजेनुसार वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
नादुरुस्त केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पूर्व व पश्चिम) या परिसरास तर वाशी मंडळांतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे एमआयडीसी, कोपरखैरणे, बोनकोडे या परिसरांना वीजपुरवठा होतो.
महापरेषणला ही तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास किमान शनिवारपर्यंत वेळ लागू शकतो. महापरेषण व महावितरणची टीम फिल्डवर कार्यरत असून, ही तांत्रिक अडचण दुरुस्त होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
महावितरणच्या कळवा येथील विद्युत उपकेंद्रातील टान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे टाटा पॉवरने शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता मुंबई शहरातील बेस्ट उपक्रमाच्या दादर किंग्जवे, सायन फोर्ट, वडाळा व माहिम या भागांमध्ये आपत्कालीन वीजभार नियमन केले होते. त्यानंतर, सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान
पुरेसा विद्युतपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या भागांत होतो वीजपुरवठा
महापारेषणच्या या केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत समतानगर, पाचपाखाडी, रहेजा कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पिटल परिसर, कशिश पार्क, लुईसवाडी, संभाजीनगर, गणेशावाडी, सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, नवपाडा, साकेत, तारांगण, राबोडी, कोपरी, विटावा, उथळसर, कोर्ट नाका, वृंदावन, माजीवडा, बालकुंब, खोपट, पॉवर हाउस, कळवा, मुलुंड या परिसरास तर वाशी मंडळाअंतर्गत पावणे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, बोनकोडे, नेरूळ, पामबीच, खारघर, कामोठे, सानपाडा, सीबीडी बेलापूर, उलवे, सीवूड, शिरवणे एमआयडीसी, घडलीय केमिकल या परिसरास वीजपुरवठा होतो.
येथील नागरिकांना बिघाडाचा शॉक
बेलापूर, वाशी, भार्इंदर, बोरीवली, मालाड, कांदिवली, वर्सोवा, भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, विद्याविहार, धारावी येथील परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
दीड महिना भारनियमन
महापारेषणच्या कळवा केंद्रात घडलेल्या या दुर्घटनेमुळे रोहित्रांसह केबलचे मोठे नुकसान झाले. दुरुस्तीसाठी बराच कालवधी लागणार असल्यामुळे येथून वीजपुरवठा होणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, मुलुंड परिसरातील नागरिकांना पुढील एक ते दीड महिना भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या प्रचंड उकाडा असून त्यातच भारनियमन करावे लागणार असल्याने सावध पवित्रा घेऊन महावितरणने परिसरातील ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.