Join us

मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज; रायगडला रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ गोव्यासह महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी दाखल झाले असून, मुंबईतदेखील या चक्रीवादळाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ गोव्यासह महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी दाखल झाले असून, मुंबईतदेखील या चक्रीवादळाने आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली आहे. शनिवार रात्रीपासूनच मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असलेले हे चक्रीवादळ सोमवारी मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांना दणका देणार आहे. सोमवारी हे चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव म्हणून सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या चोवीस तासांत ते गुजरातकडे सरकण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी १७ मे रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. १७ मेपासून १८ मेच्या सकाळपर्यंत किनारपट्टीच्या उत्तर भागात वाऱ्याचा वेग ताशी ६५ ते ७५ किमी असू शकतो. तो वाढत ताशी ८५ किलोमीटर इतका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी, खासकरून किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या चोवीस तासांत खवळलेला असेल. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात असतील त्यांनी तातडीने किनाऱ्यावर यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

असा आहे पावसाचा अंदाज

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सोमवारी तुरळक ठिकाणी खूप जोरदार, तर रायगड जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद येथे हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.