Join us  

धमक्या, राडेबाजी...आता मर्डरच बाकी! 

By अतुल कुलकर्णी | Published: April 10, 2023 9:14 AM

बिहारसारखी परिस्थिती दुर्दैवाने मुंबई, ठाणे परिसरात निर्माण झाली आहे. कोणीच कोणाला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. 

बिहारसारखी परिस्थिती दुर्दैवाने मुंबई, ठाणे परिसरात निर्माण झाली आहे. कोणीच कोणाला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. 

निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागात राडेबाजीला सुरुवात झाली आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपलीच दहशत कशी निर्माण होईल, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. मागच्या आठवड्यात ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर पंधरा ते वीस महिलांच्या गटाने हल्ला केला. त्याआधी भाजप पदाधिकाऱ्यावरही असाच हल्ला झाला. हे दोन्ही हल्ले शिंदे गटाकडून झाले असे आरोप होत आहेत. आम्ही अशा हल्ल्यांचे समर्थन करत नाही. मात्र, रोशनी यांनी फेसबुकवर ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्याचा जाब विचारायला आमच्या काही महिला गेल्या होत्या, अशी भूमिका शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी घेतली आहे. 

मध्यंतरी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भरदिवसा शिवाजी पार्कवर पायी फिरताना हल्ला झाला. त्याआधी काँग्रेसचे प्रवक्ते शरद कोळी यांच्यावर ठाण्यातील कोपरी भागात हल्ला झाला. ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांना शिंदे गटाच्या नम्रता भोसले यांनी धमकी दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे. आंग्रे यांनी आपल्याविरुद्ध वाईट पोस्ट लिहिली, असा भोसले यांचा आरोप आहे. म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. अशा घटना ही सुरुवात आहे. अगदीच बोटावर मोजण्याइतक्या घटना समोर येत आहेत. मात्र, प्रत्येक वॉर्डात एकमेकांचे हिशेब करण्याची भाषा सुरू झाली आहे. त्याची तक्रार करायलाही कोणी समोर येत नाही, हे वास्तव आहे.

पोलिसही प्रचंड दडपणाखाली आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल करून घेताना आमच्यावर प्रचंड दबाव असतो, असे ते खासगीत सांगतात. रोशनी शिंदेला भेटायला निघालेले उद्धव ठाकरे हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच रोशनी यांना डिस्चार्ज द्या, असा दबाव संबंधित डॉक्टरांवर होता. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना माध्यमांसमोर जाऊन रोशनी शिंदे गरोदर नाहीत, असे सांगायला लावले गेल्याचा आरोप होत आहे. रोशनी शिंदे गरोदर नसल्या तरी त्या आयव्हीएफच्या माध्यमातून मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे खरे असताना त्यांच्या पोटावर का लाथा मारल्या, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेतली. त्यावरून देखील पुन्हा वेगळेच आरोप सुरू झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे ठाणे, मुंबई अथवा नवी मुंबई असो, शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. याला वेळीच आवर घातला नाही तर ही नाराजी किती नुकसान करेल हे कळणारदेखील नाही. आज काहीही बोलायचे नाही, असे ठरवून आम्ही घराबाहेर पडतो.

मात्र, आमचा हा  निश्चय बारा वाजेपर्यंत टिकतो. समोरून कोणी तरी काही तरी बोलतो आणि मग आमचेही लोक सुरू होतात... हे थांबवायचे कसे हे आम्हालाच कळत नाही, अशी खंत शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी बोलून दाखवली. याचा अर्थ हे प्रकार शिंदे गटातल्या काही नेत्यांना मान्य नाहीत हे स्पष्ट आहे. मात्र, जसजसे दिवस निघून जातील तशी परिस्थिती बिघडत जाईल. त्यामुळेच ठाणे महापालिकेत शिंदे गटासोबत युती करायची नाही, अशी भूमिका स्थानिक भाजपने घेतली आहे. दूध का दूध... पानी का पानी, जे काय व्हायचे ते होऊन जाऊ द्या. ज्याचे संख्याबळ जास्त, त्यांचा महापौर होईल, अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली आहे.

शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये होणारी भांडणे आरोप- प्रत्यारोप आणि हाणामाऱ्या, राडेबाजी या गोष्टींचा फटका आपल्याला बसू नये यासाठी ठाण्यातील भाजप नेते जसे गप्प आहेत, तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील नेते, कार्यकर्तेदेखील जे चालू आहे ते शांतपणे बघत आहेत. ठाकरे गटाचे नेते देखील सतत काही तरी क्लृप्त्या लढवून आपल्याभोवती सहानुभूती कायम कशी राहील, याचे प्रयत्न करत आहेत. हे डावपेच समजून घेऊन त्यासाठीची रणनीती आखण्याची गरज आज तरी शिंदे गटाला वाटत नाही. रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला गेले की सगळे काही व्यवस्थित पार पडेल, असे त्यांना वाटत असावे.

बिहारसारखी परिस्थिती दुर्दैवाने मुंबई, ठाणे परिसरात निर्माण झाली आहे. कोणीच कोणाला समजून घेण्याच्या तयारीत नाही. जेवढे प्रक्षोभक बोलता येईल तेवढे बोलायचे. नवनवे वाद निर्माण करायचे. सोशल मीडियातून एकमेकांच्या विरोधात वाटेल ते लिहायचे. त्यानंतर ज्याच्या विरोधात लिहिले आहे त्याने दुसऱ्याला धमक्या द्यायच्या. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल करायच्या. हे प्रकार दिवसागणिक वाढत चालले आहेत. या सर्व प्रकारातून निवडणुकीच्या तोंडावर जर कोणाचा खून झाला तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असे जुने जाणते लोक आता बोलून दाखवत आहेत. याचसाठी केला होता का अट्टाहास...? असे सवाल दबक्या आवाजात का होईना लोक बोलू लागले आहेत.

ठाणेकरांचे म्हणणे काय?- ठाणे शांत शहर आहे. सांस्कृतिक वारसा या शहराला आहे. मुंबईपेक्षा ठाण्यात जास्त सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आजही मराठी बोलणाऱ्यांची संख्या ठाण्यात जास्त आहे. हा वर्ग पटकन रिॲक्ट होणार नाही; पण जे काही आपल्या आजूबाजूला चालू आहे ते बघून तो अस्वस्थ आहे.- सत्तेचे आणि आरोप- प्रत्यारोप, राडेबाजीचे केंद्र ठाणे बनू पाहत आहे. ही नवी ओळख ठाण्याला परवडणारी नाही. ठाणेकरांना तर बिलकूल आवडणारी नाही; पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, असा प्रश्न प्रत्येकाला आहे.