Join us

मुंबई-ठाणे वाहतूक दोन दिवस राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 3:02 AM

वाहतूक ऐरोली मार्गे : कोपरीच्या पूल गर्डरचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील कोपरी पूल येथे लोखंडी गर्डर टाकण्याचे काम १६ आणि १७ जानेवारी रोजी रात्री होणार असल्याने मुंबई ते ठाणे मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे ठाणे ते मुंबई जाणाऱ्या वाहनचालकांनी अन्य मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

एमएमआरडीए अंतर्गत १६ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ६ तसेच १७ जानेवारी रोजी रात्री ११ ते १८ जानेवारी रोजी सकाळी ६ या काळात कोपरी रेल्वे ब्रिजवरून ठाणे ते मुंबई आणि मुंबई ते ठाणे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गाने जाणाऱ्या मोठ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक - पारसिक रेती बंदर - मुंब्रा बायपास शीळफाटा पुढे महापे येथून ऐरोली ब्रिज मार्गे मुंबईकडे जातील, असे वाहतूक विभाकडून सांगण्यात आले.

असा आहे पर्यायी मार्गn घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांना माजीवडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास तसेच गोल्डन क्रॉस माजीवडा ब्रिजखाली प्रवेश बंद केला जाणार आहे. त्याऐवजी ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नलपुढे माजीवडा ब्रिजवरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन पारसिक रेतीबंदर मार्गे ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने जातील. 

अशी जातील लहान वाहनेनाशिक व घोडबंदर रोडने ठाणे शहरातून पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या लहान वाहनांना कोपरी ब्रिजकडे प्रवेश बंद असून त्याऐवजी ही वाहने साकेत येथून कळवा, विटावा, ऐरोलीमार्गे जातील. याशिवाय ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड येथून कळवा ब्रिज, विटावा, ऐरोली मार्गे मुंबईत जातील. घोडबंदर रोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी लहान वाहने ही तीनहात नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एलबीएस रोडने मॉडेला चेकनाका मार्गे मुंबईकडे जातील.

तसेच घोडबंदर रोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी लहान वाहने तीनहात नाका, महालक्ष्मी मंदिर तसेच सेवा रस्त्याने बारा बंगला मार्गे आनंदनगर चेकनाकामार्गे मुंबईकडे जातील, असेही उपायुक्त पाटील यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईठाणे