लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ठाणे : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून शनिवारी मुंबईतील रुग्णांच्या संख्येत एक हजार ७०८ रुग्णांची भर पडली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. तर ठाणे जिल्ह्यात दिवसभरात एक हजार १६९ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण, सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ९८५ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५२४ झाला आहे. मुंबईत १३ हजार २४७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत दिवसभरात ९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३२० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ३५ लाख ३७ हजार ६६४ चाचण्या झाल्या आहेत.
मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ३१ असून, सक्रिय सीलबंद इमारती २२० आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १२ हजार चार अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.
..............
सर्वाधिक मृत्यू ६० ते ६९ या वयाेगटातील
मुंबईत झालेल्या ११ हजार ५१९ रुग्णांच्या मृत्युपैकी ५० ते ५९ वयोगटांतील २ हजार ४९४, ६० ते ६९ वयाेगटातील ३ हजार ३०२, ७० ते ७९ वयाेगटातील २ हजार ७७२, ८० ते ८९ वयाेगटातील १ हजार २८४, तर ४० ते ४९ या वयाेगटातील १ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
...............
कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक बाधित
जिल्ह्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या दोन लाख ७५ हजार ४५२ वर पोहोचली आहे, शनिवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने वर्षभरातील मृतांची संख्या सहा हजार ३३२ झाली.
ठाणे शहरात ३३८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६५ हजार २१६ झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४१२ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ४०९ रुग्णांची वाढ झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ६६ हजार ५५३ रुग्णबाधित असून, एक हजार २११ मृतांची नोंद झाली आहे, तर नवी मुंबई शहरातही दोघांचा मृत्यू झाला आहे.
उल्हासनगरमध्ये ३५ रुग्ण सापडले असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. येथील एकूण बाधितांची संख्या १२ हजार १४१, तर मृतांची संख्या ३७३ वर गेली आहे. भिवंडीत १४ नवीन बाधितांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या सहा हजार ९२० झाली आहे, तर मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा-भाईंदरमध्ये ५७ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ८५४ असून, मृतांची संख्या ८०६ आहे.
अंबरनाथमध्ये ३४ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. येथे बाधित नऊ हजार १२२ असून, मृत्यू ३१६ आहेत. बदलापूरमध्ये ४३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ४४९ वर गेली आहे. या शहरात एकही मृत्यू नसल्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या १२३ आहे. ग्रामीणमध्ये ६४ रुग्णांची वाढ झाली असून, एकही मृत्यू नाही. आतापर्यंचे बाधित रुग्ण १९ हजार ८६१ असून, एकूण ५९८ मृत्यू झाले आहेत.