मुंबई-ठाणेकर सुखावले; निर्बंध आजपासून शिथिल; हॉटेल, जीम, सलून अटींसह होणार खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:19 AM2021-06-07T09:19:00+5:302021-06-07T09:19:40+5:30
CoronaVirus : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल बंदच असली, तरी अन्य सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मात्र त्यातून उभ्याने प्रवास करता येणार नाही.
मुंबई : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सोमवारपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. विशेषत: दुकाने चार वाजेपर्यंत खुली राहणार असून काही अटींसह हॉटेल्स, सलून, जीम यांनाही परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल बंदच असली, तरी अन्य सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मात्र त्यातून उभ्याने प्रवास करता येणार नाही.
निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह विविध महानगरपालिका आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील नागरिक सुखावले असून येत्या काळात थोडी मोकळीक मिळेल, असे वातावरण आहे. मागील वेळी निर्बंध मागे घेतल्यानंतर अनेकांनी नियमांना फाटा दिल्याने साथ वाढली होती. त्यामुळे या वेळी सवलती मिळाल्यानंतरही निर्बंध पाळण्याचे आवाहन त्या-त्या स्थानिक प्रशासनाने केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे संसर्ग माेठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याने आता राज्य शासनाच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यानुसार, महापालिकांच्या क्षेत्रानुसार रविवारी नवे नियम जारी करण्यात आले.
मुंबईत सोमवारपासून बेस्ट पूर्ण क्षमतेने धावेल. उद्याने, खुल्या मैदानांसाठीचे निर्बंधही काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.
नवी मुंबईकरांनाही दिलासा
नवी मुंबईचा लेव्हल-२ या गटामध्ये समावेश होत असून, महापालिकेच्या माध्यमातून अनलॉकचे आदेश घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील मॉल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने आजपासून सुरू राहतील. खेळण्याच्या सरावासह व्यायामासाठीही परवानगी देण्यात आल्याने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पनवेलमधील दुकानेही चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
पालघरला दुकाने शनिवारी-रविवारी बंद
वसई-विरारसह पालघर जिल्हा तिसऱ्या स्तरावर असून, सोमवारपासून जिल्ह्यात काही अटी व शर्तींच्या अधीन राहून अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी-रविवारी बंद राहतील. मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद राहतील. सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहणार आहे.
ठाणे जिल्ह्यातही दिलासा
- ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून काही निर्बंध शिथिल केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. ठाणे, नवी मुंबई या शहरांचा दुसऱ्या स्तरात समावेश आहे.
- मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड ही शहरे तिसऱ्या स्तरात ठेवली आहेत. त्यानुसार दुसऱ्या स्तरातील निर्बंध बऱ्यापैकी व तिसऱ्या स्तरातील निर्बंध
हे काहीअंशी शिथिल होणार आहेत.
रायगडमध्ये बससेवा ५० टक्के क्षमतेने
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रायगडकरांसाठी सोमवारपासून नवीन नियम जाहीर केले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने संपूर्ण आठवडा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच सार्वजनिक बस वाहतूक ५० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू राहतील.
मुंबईत अशी असेल मुभा
दुकाने/ आस्थापना यांच्यासाठी वेळ : सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार बंद)
मॉल / चित्रपटगृह (एकल स्क्रीन असलेले मल्टिफ्लेक्स) / नाट्यगृह : बंद.
उपाहारगृह : क्षमतेच्या ५० टक्के, जेवणासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत. त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी.
सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वॉकिंग, सायकलिंग : रोज पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत.
खासगी कार्यालये उघडण्याबाबत : सर्व. दुपारी ४ वाजेपर्यंत. अपवादात्मक श्रेणी वगळून
कार्यालयात उपस्थिती शासकीय कार्यालयासह (खासगी - जर मुभा असेल) : ५० टक्के.
क्रीडा : आउटडोअर पहाटे ५ ते ९. संध्याकाळी ६ ते ९.
लोकांची उपस्थिती (सामाजिक / सांस्कृतिक / मनोरंजन) : क्षमतेच्या ५० टक्के, शनिवारी, रविवारी मनाई.
लग्न समारंभ : ५० लोक.
अंत्यसंस्कार : २० लाेक.
बांधकाम : फक्त त्या ठिकाणी राहणारे
मजूर / किंवा मजुरांना दुपारी ४ वाजेपर्यंत मुभा.
जमावबंदी / संचारबंदी : संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी, ५ नंतर संचारबंदी.
जीम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा / वेलनेस केंद्र : दुपारी ४ वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसीची परवानगी नाही.
सार्वजनिक वाहतूक : १००%. उभे राहून प्रवासास परवानगी नाही.