Join us

Mumbai: इथे साजरा होतो झाडांचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 3:06 PM

Mumbai:

- विजय पाटील  (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय संस्कार केंद्र संचालित अक्षर विद्यालय)रायगड जिल्ह्यातील पेण-हमरापूर या गावात १६ जून १९९७ साली माध्यमिक शाळा आम्ही सुरू केली. या शाळेत वेगळी योजना राबवायचा विचार करत असताना त्यावेळचे उपवन संरक्षक सुनील लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००० साली वृक्षारोपण योजना सुरू केली. त्यावेळी सुमारे ५ हजार झाडे विद्यार्थ्यांनी लावली. पण, त्यातील काही झाडे चोरीला गेली, तर काही जगली नाहीत. मग ही लावलेली झाडे जगवायची कशी याचा विचार करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी झाडांचे वाढदिवस साजरे करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देऊन शाळेत वृक्ष वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना सुरू केली. ही बातमी मुख्यमंत्र्यांना कळताच त्यांनी मला शुभेच्छा पत्र देऊन शाळेचे कौतुकदेखील केले होते.

आपल्या मुलांप्रमाणेच झाडांचे वाढदिवस करून त्यांना वाढवा, जगवा, त्यांचे रक्षण करा, असा संदेश देणारा हा उपक्रम आहे. आपण पाळीव प्राण्यांचे वाढदिवस करतो. परंतु, झाडांचे वाढदिवस साजरे करणारा हा देशातीलच नव्हे तर जगातील पहिला उपक्रम आहे. या कार्यक्रमाची १५ दिवसांपासून तयारी सुरू असते. विद्यार्थी- शिक्षक झाडांना फुगे बांधून सजावट करतात. झाडाचे पूजन करून पाहुण्यांच्या हस्ते केक कापला जातो. याच वेळी हॅपी बर्थडे .....हॅपी बर्थ.... डे टू यू ट्री असे गाणे म्हणत जल्लोषात वाढदिवस साजरा केला जातो.

‘पुस्तकांच्या बाहेरचे जग शिकवणारी शाळा’विद्यार्थ्यांचा हा उत्साह पाहून वृक्ष वाढदिवस समारंभाचे प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी “पुस्तकांच्या बाहेरचे जग शिकवणारी शाळा” असे गौरवोद्गार काढत शाळेसह मुलांना शाबासकी दिली. आतापर्यंत या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी उपस्थित राहिले आहेत.

प्रत्येकाचा हिरिरीने सहभाग२०१६ साली शासनाची दोन कोटी वृक्ष लागवड योजना जाहीर होताच या योजनेतून सुमारे ३० ते ४० हजार झाडे लावण्यात आली. विद्यार्थी, ग्रामस्थ आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या योजनेचा प्रारंभ सुप्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर यांच्या हस्ते झाला. 

विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम झाडे लावणे सोपे आहे. पण ती जगवणे अवघड आहे. येथे वणवा पेटतो. वणव्यात जी झाडे होरपळी आहेत, तेथे नवीन झाडे लावली जातात. वृक्षसंवर्धनाचे कामही विद्यार्थी करतात. उपक्रम सुरू केल्यापासून सुंदर वनश्री निर्माण झाल्याने हवेची गुणवत्ता उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही उत्तम आहे. 

टॅग्स :मुंबई