Mumbai: महापालिकेच्या निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित
By संतोष आंधळे | Published: January 14, 2024 08:36 PM2024-01-14T20:36:51+5:302024-01-14T20:37:14+5:30
Mumbai News: महानगरपालिकेच्या अखत्यारीतील के इ एम, सायन आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा ( बॉण्ड सर्व्हिस ) या विषया वरून सोमवार पासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता.
- संतोष आंधळे
मुंबई - महानगरपालिकेच्या अखत्यारीतील के इ एम, सायन आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा ( बॉण्ड सर्व्हिस ) या विषया वरून सोमवार पासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा विषय सोडविण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या निवासी डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधि आणि संबंधित अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवासी डॉक्टरांनी जे सोमवार पासून सामूहिक रजा आंदोलनाचा जो इशारा दिला होता. ते आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. बुधवारच्या बैठकीनंतर आंदोलनाबत पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे.
महापालकेच्या चार मुख्य रुग्णालयात तीन वर्षाचे मिळून सुमारे २५०० निवासी डॉक्टर आहेत. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना जी सेवा दिली जाते त्यामध्ये या निवासी डॉक्टरांचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्यशीवाय ही मोठी रुग्णालये चालविणे कठीण आहे. या गोष्टीची पूर्ण कल्पना महापालिका प्रशासन आणि शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला आहे. जर या वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेली तर याचा मोठा फटका रुग्णसेवेला पडू शकतो. रुग्णावर उपचार देण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात.
शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालातयून शिक्षण घेतलेल्या सर्व विध्यार्थ्यांना शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात एक वर्षासाठी सेवा देणे बंधनकारक आहे. याकरिता महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणत्या रुग्णालयात बंधपत्रित सेवा द्यावी हे ठरविण्यात येते.
मात्र २१०२ साली झालेल्या कोर्ट प्रकरणानंतर हे ठरविण्याचे अधिकार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला देण्यात आले होते. मात्र तरीही काही प्रमाणात या जागा महापालिकेच्या स्तरावर भरल्या जात होत्या. मात्र त्यांनी अशा पद्धतीने जागा भरू नये अन्यथा त्याची बंधापत्रित सेवा ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचा फतवा शासनातर्फे काढण्यात आला होता. हा निर्णय महापालिकेच्या निवास डॉक्टरांना मान्य नसल्यामुळे त्यांनी सामूहिक राजेंचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
बंधपत्रित सेवा भरण्याच्या मुद्द्यावरून काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही हे सामूहिक रजेचे आंदोलन करणार होतो. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी बुधवारी बैठक बोलावली आहे. त्यामध्ये आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याना सुद्धा बोलविले आहे. त्यामध्ये महापालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये ही बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत काय तोडगा निघतो यावरून आंदोलन करायचे कि नाही या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
- डॉ वर्धमान रोटे
अध्यक्ष
महापालिका निवासी डॉक्टर संघटना