यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी

By सचिन लुंगसे | Published: May 24, 2024 10:04 PM2024-05-24T22:04:30+5:302024-05-24T22:05:35+5:30

Mumbai Suburban Railway: ऐन पावसाळ्यात लोकल खोळंबून मुंबईकरांना मनस्ताप होऊ नये म्हणून मध्य रेल्वे सज्ज झाली असून, मध्य रेल्वे प्रशासनाकडून बहुतांशी रेल्वे स्थानकांवर उपाय योजना करण्यात येत आहे.

Mumbai: The local will not be closed during this monsoon season, successful preparation by the railways | यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी

यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी

मुंबई - ऐन पावसाळ्यात लोकल खोळंबून मुंबईकरांना मनस्ताप होऊ नये म्हणून मध्य रेल्वे सज्ज झाली असून, मध्य रेल्वे प्रशासनाकडून बहुतांशी रेल्वे स्थानकांवर उपाय योजना करण्यात येत आहे. विशेषत: रेल्वे रुळांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यापासून सुरुवात करण्यात येणार असून, गाळ काढण्याच्या कामासह साफसफाईच्या कामाला वेग देण्यात येत आहेत.

लोकल रेक सुरक्षित आणि आरामदायी चालवण्यासाठी कारशेडमध्ये पावसाळ्यातील खबरदारीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने ट्रॅक्शन मोटर्स, एक्सल बॉक्स, जंक्शन बॉक्स, हेडलाइट्स, लुकआउट ग्लास इत्यादी कामे सुरु आहेत. रेल्वे इंजिनांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन विभागाने लोकोमोटिव्हला अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी काम केले आहेत. ओव्हर हेडच्या आसपासच्या ६ हजार पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. मुंबई विभागात अर्थिंग, बाँडिंग आणि लाइटनिंग अरेस्टर तपासले गेले आहेत.  सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन विंगने कमी इन्सुलेशनसाठी केबल्सची चाचणी करणे, सदोष केबल्स बदलणे आणि पूल आणि कल्व्हर्टवरील केबल्सचे संरक्षण करणे यासारखी कामे झाली आहेत.
 
पंपिंग सुविधा
२४ ठिकाणी १९२ पंप दिले जाणार आहेत. रेल्वे १६१ पंप आणि महापालिका उर्वरित ३१ पंप पुरवणार आहे. मस्जिद बंदर, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळक नगर येथे ही सुविधा असेल.
 
टनेलिंगचे काम
मस्जिद, सँडहर्स्ट रोड, दादर-परळ परिसर, माटुंगा-सायन परिसर, कुर्ला कारशेड, टिळक नगर नाला, दिवा आणि कळवा अशा ठिकाणी मायक्रो टनेलिंग आहे. विक्रोळी-कांजूरमार्ग, कांजूरमार्ग आणि सायन येथे ३ नवीन ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम सुरू आहे.

गाळ काढणे
११९.८२ किमी नाल्यांचे गाळ काढणे आणि साफसफाई करण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी ६८.४४ किमीचे काम पूर्ण झाले आहे. आणखी ५१.३८ किमी नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे.
 
कल्व्हर्ट्स स्वच्छ
९२ कल्व्हर्ट्स स्वच्छ केले आहेत. आणखी ६४ पुलांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. कुर्ला-ट्रॉम्बे परिसर, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार-एलटीटी परिसर आणि टिळक नगर येथे आरसीसी बॉक्स टाकून कल्व्हर्टचे काम सुरु आहे.
 
- १५६ झाडे तोडण्याचे व छाटण्याचे काम करण्यात आले असून २ झाडांचे काम प्रगतीपथावर आहे.
- मुख्य मार्गावरील ५५ हजार घनमीटर गाळ साफ करण्याचे आणि काढण्याचे उद्दिष्ट आहे.
- घाट विभागातील अतिसंवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही आणि दूरध्वनी कनेक्शन देण्यात आले आहेत.
- हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पूरप्रवण भागात नियुक्त कर्मचाऱ्यांशी देखरेख आणि सतत माहिती घेण्यासाठी संपर्क ठेवला जाईल.
- पावसाळ्याच्या कालावधीत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून ट्रॅकवरील पाऊस आणि पाण्याच्या पातळीचे निरीक्षण केले जाईल.

Web Title: Mumbai: The local will not be closed during this monsoon season, successful preparation by the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.