Mumbai: अडगळ ठरणाऱ्या बेवारस वाहनांचा महापालिका लावणार निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:19 PM2023-04-18T12:19:42+5:302023-04-18T12:20:04+5:30
Mumbai: मुंबई शहर व उपनगरांत बेवारस वाहनांचा प्रश्न अधिक जटिल होत असून उड्डाणपुलाखाली, रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५,५५५ वाहने महापालिकेने जप्त केली आहेत.
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत बेवारस वाहनांचा प्रश्न अधिक जटिल होत असून उड्डाणपुलाखाली, रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५,५५५ वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. ही वाहने पालिकेच्या गोदामात असून, त्यांचे मालक अजून पुढे आलेले नाहीत. कुणीही पुढे न आल्यास या वाहनांचा लिलाव करण्यात येईल. मात्र शहरातील बेवारस वाहनांवरील कारवाई अधिक तीव्र होत नसल्याने आणि समन्वयाचा अभाव असल्याने २४ वॉर्डात लवकरच नोडल अधिकारीही नेमले जाणार आहेत.
जुनी आणि गुन्ह्यांमध्ये वापर केलेली अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. जप्त केलेली ५ हजार ५५५ वाहने पालिका गोदामात आहेत. गेल्या वर्षभरात यात १० हजार ६१३ वाहनांची वाढ झाली आहे. वाहने हटवण्यासाठी मालकांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर ३ हजार ६८५ वाहने त्यांच्या मालकांकडून हटविण्यात आली. परंतु इतर वाहनांचे मालक वाहने हटविण्यासाठी पुढे न आल्याने पालिकेने गोदामात ठेवली आहेत. एक महिनाभर ही वाहने गोदामात ठेवून मग त्यांचा लिलाव केला जातो. कोरोनाकाळात बेवारस वाहने हटवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे दिली होती. मार्च २०२२ पासून ही जबाबदारी पुन्हा पालिकेकडे आली.
एकूण कारवाई केलेली वाहने १०, ६१६
नोटीस दिलेली वाहने ९,४८५
पालिकेकडून टोईंग केलेली वाहने ४,६४२
मालकांनी काढून टाकलेली वाहने ३,६८५
खासगी संस्थाकडून टोईंग केलेली वाहने ५,५५०
मुदतीत मालकाकडून सोडविलेली वाहने २१४
मुदतीनंतर सोडविण्यात आलेली वाहने २६
पालिकेकडे अद्याप वाहने ५,५५५
महसुलासाठी नाही, तर स्वच्छ मुंबईसाठी
मुंबईत सध्या सुमारे तीन हजारांवर बेवारस गाड्या विविध रस्त्यांवर आहेत. या गाड्या उचलण्यासाठी पालिकेला ब्रेन, डंपर, गाड्यांची गरज लागणार आहे. यासाठी मोठा खर्च येतो. मात्र भंगार गाड्यांच्या लिलावातून महसूल मिळतो. मात्र या उपक्रमात महसूल मिळविणे हा पालिकेचा उद्देश नाही तर स्वच्छ मुंबईसाठी हा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.