Mumbai: येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज
By मनोहर कुंभेजकर | Published: May 6, 2023 12:28 PM2023-05-06T12:28:36+5:302023-05-06T12:28:53+5:30
Mumbai: १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मात्र आपण त्यांना अपेक्षित असलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाहीत. त्यामुळे आज आपल्या येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मात्र आपण त्यांना अपेक्षित असलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाहीत. त्यामुळे आज आपल्या येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन बौद्ध संस्कृतीचे गाढे अभ्यासक अतुल भोसेकर यांनी केले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्त चार बंगला, अंधेरी पश्चिम येथे ते बोलत होते.
कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला केंद्राचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी पाहुण्यांचा परिचय करून देतांना सांगितले की, संस्थेत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग, लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षांचे वर्ग, उद्योजकता कार्यशाळा, पत्रकारितेचे वर्ग व बौद्ध धम्म अभ्यासक्रम इत्यादी उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
अतुल भोसेकर पुढे म्हणाले की, प्राचीन भारताला सोने की चिडिया म्हणून संबोधित होते. बौद्ध धम्माचे महत्त्व व संस्कृती यावर त्यांनी सविस्तर भाष्य करून लोकांना मंत्रमुग्ध केले. इ. सन. पूर्वी पासून गौतम बुद्ध यांनी अनेक चांगल्या गोष्टी दिल्या, त्यामुळे जवळपास बाराशे वर्षे या देशात सोन्याचा धूर निघत होता. भारतात जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय नालंदा येथे सुरू झाले. त्यात वीस हजार विद्यार्थी विविध विषयांवरती संशोधन करत होते व त्यांना शिकवण्यासाठी 2000 विद्वान प्राध्यापक होते. सम्राट अशोकाने प्रथम लिपीचा उगम घडविला. बौद्ध महाकवी आचार्य अश्वघोष यांनी जगातील सर्वप्रथम कविता, बुद्ध चरित्र लिहिली व पुढे त्यात फेरफार करून कवी कालिदास यांनी काही नाटके लिहिली व त्यांना महान कवी उपाधी मिळाली अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी पाली भाषेचा अर्थ समजवा म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषेत शब्दकोश तयार केला, शेवटी आपल्या भाषणाचा समारोप करताना अशा कार्यक्रमांना मुलांना आवर्जून आणत चला त्यांना धम्म शिकण्याची आवश्यकता असून त्यांना हा वसा खऱ्या अर्थाने पुढे चालवायचा आहे
असे मत त्यांनी व्यक्त केले.
रुईया कॉलेजच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी आपल्या भाषणात प्रज्ञा, शील, करुणा, विपश्यना, पंचशीलचे पालन आदींचे महत्त्व अधोरेखित केले. पंचशील ही बौद्ध धम्मातील आचरण नियमावली आहे. प्रा. वाघमारे पुढे म्हणाल्या की, भगवान गौतम बुद्धाने आपल्या जीवन काळात केलेल्या उपदेशात एक महत्त्वपूर्ण उपदेश म्हणजे महासत्ताकपठण सूक्त विपशनेच्या विविध अंगकारी आहेत व जर एखादा अविष्कार लोक कल्याणी असेल तरच तो निबानापर्यंत पोहोचू शकतो असे सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे रत्नाकर रिपोटे, सदाशिव गांगुर्डे, नीना हरिनामे, शाहीर विष्णु शिंदे, डॉ. गौतम सोनवणे, डॉ. उज्जैन जाधव, बापूसाहेब रामटेके, हंसराज काजळे, शांताराम भोसले, जे. पी. वर्मा, कवियत्री आशालाता कांबळे, ज्योत्स्ना दिघे तसेच सीनियर सिटीजन संघटनेचे केळवे गुरुजी, मेजर अरुण शिरीषकर आदी मान्यवर उपस्थित होते.