मुंबई : मालाड पश्चिमेच्या लिंक रोड परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलमध्ये एका दुकानात कपडे, चपला आणि आर्टिफिशियल ज्वेलरी विक्री करता ठेवण्यात आले होते. त्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यावर बांगुरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी महिला ही नालासोपारा परिसरात राहणारी असून शुभांगी सुळे असे तिचे नाव आहे. तीही अन्य कर्मचाऱ्यांसोबत याठिकाणी काम करत होती. मात्र, १ डिसेंबर २०२२ पासून दुकानातील काही वस्तू कमी होत आहेत असे व्यवस्थापक आकाश कदम (वय ३८) यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुकानातील कर्मचारी पूजा गौड, शुभांगी सुळे आणि राहुल कनोजिया यांना याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांना कल्पना नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राहुल याने सुळेचे
इन्स्टाग्रामवरील फोटो कदम यांना दाखविले. तेव्हा तिच्या अंगावर दुकानातून चोरी झालेल्या वस्तू तिने घातल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानुसार सुळेला विचारणा केल्यावर तिने दुकानातून चोरी केल्याचे कबूल करताच तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र, चोरून नेलेल्या मालाची नुकसानभरपाई मी देते असे तिने सांगितले होते. मात्र, तिने कोणतीही भरपाई दिली नाही.
दुकानातील १५ टॉप्स, १३ ड्रेस, ३ कानातील रिंगा आणि वेगळ्या प्रकारच्या चपला असा १ लाख ४८ हजार ४६१ रुपयांचा ऐवज तिने लंपास केला. दुकानातील प्रत्येक वस्तूवर एक विशिष्ट अक्षर हे •लिहिलेले असते त्यामुळे तक्रारदाराने त्या वस्तू आपल्या दुकानातीलच आहेत हे ओळखल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी सुळेवर बांगुरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.