मुंबईत युतीविरुद्ध आघाडी थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:42 AM2019-04-11T00:42:29+5:302019-04-11T00:42:44+5:30

सक्षम उमेदवाराअभावी तिरंगी : चौरंगी लढतीची शक्यता मावळली

In Mumbai, there is a direct fight against the alliance | मुंबईत युतीविरुद्ध आघाडी थेट लढत

मुंबईत युतीविरुद्ध आघाडी थेट लढत

Next

मुंबई : कोणत्याच मोठ्या पक्षात उमेदवारी वगैरेवरून बंडखोरी नाही, छोटे पक्ष अथवा अपक्षांकडूनही कोणी दमदार, मोठ्या नेत्याचा अर्ज आलेला नाही. त्यामुळे मुंबईतील सहाही मतदारसंघात युती विरुद्ध आघाडी असा थेट सामना होणार आहे. कोणत्याच मतदारसंघात तिरंगी अथवा चौरंगी लढत होण्याची शक्यता नाही.


मुंबईत चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी दाखल उमेदवारांच्या अर्जाची बुधवारी छाननी झाली. छाननीनंतर सहा जागांसाठी १२९ जणांचे अर्ज वैध ठरले. मात्र यात युती विरूद्ध आघाडीच्या लढतीचे समीकरण बदलू शकेल, असा प्रभावशाली नेता नाही. १२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उरणार हे अधिकृतपणे जाहीर होणार आहे. मात्र, दाखल झालेल्या अर्जांचा विचार करता युती विरुद्ध आघाडी अशीच थेट लढत होणार असून इतर घटक फार चमकदार कामगिरी करू शकतील अशी स्थिती नाही.


गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात सरासरी ५०-६० हजार मते खेचणाऱ्या मनसने यंदा निवडणूक आखाड्यापासून लांब राहण्याचा निर्णय घोषित केले आहे. निवडणूक लढविण्याऐवजी आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाच्या विरोधात राजकीय किल्ला लढविण्याची मनसेची खेळी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे उमेदवारामुळे मतविभागणी अथवा मतांचे समीकरण बदलण्याची शक्यता नाही.


गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला आहे. प्रकाश आंबेडकर यांना दलित समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यातच एमआयएमनेही आंबेडकरांना पाठिंबा जाहिर करत वंचित आघाडीचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे अनेक मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार प्रभावी ठरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, मुंबईपुरता विचार करायचे तर मुंबईत वंचित आघाडीने एकही प्रभावशाली अथवा राजकीयदृष्टया शक्तीशाली उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे किमान मुंबईत तरी वंचित आघाडी फार मोठे उलटफेर करण्याची शक्यता नाही.

असा होईल उमेदवारांमध्ये सामना
सध्याच्या स्थितीवरून उत्तर मुंबईत भाजपाचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरूपम, उत्तर पूर्वेत भाजपचे मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील, उत्तर मध्यमध्ये भाजपच्या पूनम महाजन विरुद्ध कॉंग्रेसच्या प्रिया दत्त, दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा, अशी थेट लढत असणार आहे.

Web Title: In Mumbai, there is a direct fight against the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.