मुंबापुरीत जाऊ त्या रस्त्यावर वाहतूककोंडी, अर्धा ते पाऊणतास रखडपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:46 AM2023-11-29T09:46:22+5:302023-11-29T09:47:41+5:30
एमएमआरडीए, महापालिकेच्या कामांनी अडविले रस्ते.
मुंबई :मुंबई ते ठाणे या मार्गाला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीवर सायनपासून घाटकोपरपर्यंत गॅरेजचालकांसह भंगारवाल्यांनी काबीज केलेले फुटपाथ, एकदिशा करण्यात आलेला काळे मार्ग (कुर्ला - अंधेरी रस्ता), बैलबाजारातल्या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक वाहणाऱ्या या वाहतुकीने नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहेत. यात भर म्हणून की काय कुर्ला डेपो येथे सुरु असलेले मेट्रो २ ब चे काम आणि कमानी जंक्शन येथील पालिकेच्या कामाने पादचऱ्यांसह वाहनचालकांच्या मनस्तापात भर घातली असून, प्रवासासाठी ३० मिनिटे लागतात.
महापालिकेने काही वर्षांपूर्वी सायन ते कुर्ल्यापर्यंतच्या फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई केली होती. मात्र आता परिस्थिती जैसे थे तैसे आहे. कुर्ला सिग्नलवर वाहतूक पोलीस उभे असतात. पण पीक अवरला कोंडी फोडताना त्यांनाही घाम फुटतो. - प्रशांत बारामती, स्थानिक
बैलबाजारातला रस्ता खुपच खराब झाला आहे. नागरिकांच्या अडचणी प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजेत. विद्यार्थी कायम या रस्त्यावरून प्रवास करत असतात. इतर प्रवासी आहेत. प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत असेल तर हे वाईट आहे. - राकेश पाटील, स्थानिक
भंगारही फुटपाथवर:
सायनपासून कुर्ला डेपोपर्यंत लाल बहादूर शास्त्री मार्गावरील दोन्ही बाजूच्या फुटपाथवर भंगार दुकानांचे साहित्य पडून असते. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते.
नागरिकांना मोठा मनस्ताप :
कमानी जंक्शन येथे पालिकेकडून भूमिगत वाहिन्यांचे काम हाती घेतले आहे. कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या या कामाचे साहित्य रस्त्यावर आणि फुटपाथवर पडून असते. यातून चिखलमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने याचा मनस्ताप होतो.
रस्ता सुरू कधी होणार?
काळे मार्गावरील कमानीहून बैलबाजाराकडे जाणारी एक दिशा वाहतूक दोनएक वर्षे बंद आहे.
यामुळे बैलबाजारातून कमानीकडे येणारी वाहने वेगाने येत आहेत.
यात अवजड वाहनांचा समावेश असून, सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची भीती वाढली आहे.
कोंडी आणि मनस्ताप:
मगन नथुराम मार्गावर काळे मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
त्यामुळे दिवसभर हा रस्ता जाम असतो.
बेस्टसह सगळीच वाहतूक या मार्गावरून जात असून, उलट दिशेकडून वाहणाऱ्या दुचाकी भर घालतात.
त्यामुळे होणारी कोंडी मनस्तापात भर घालत आहे.