Join us

मुंबईत झोडपधारांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ ते ५ या वेळेत कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरविली. विशेषत: मुंबईच्या उपनगरातील सखल भागात पाणी साचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली हाेती. मात्र सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार, १६ जूनच्या सकाळी ८ वाजल्यापासून १७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १०२ मिलीमीटर पाऊस नाेंदवण्यात आला. तर एकूण ५ ठिकाणी बांधकामाचा भाग काेसळला. ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. विशेषत: मुंबईच्या उपनगरात गुरुवारी सकाळी १० आणि दुपारी ३ च्या आसपास पावसाने तुफान फटकेबाजी केली. अधूनमधून पावसाचा मारा सुरू असला तरी मुंबईचा वेग मात्र तसूभरही कमी झाला नव्हता. उपनगरी रेल्वेसह येथील रस्ते वाहतूक सर्वसाधारणरित्या सुरू होती. पाऊस कोसळत असतानाही मुंबईच्या रस्त्यांवर दुपार वगळता सकाळी आणि सायंकाळी नागरिकांची गर्दी कायम असल्याचे चित्र होते.

दरम्यान, १८ जून रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

............................................