मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नाही, हे विधान आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता महाराष्ट्रात सगळ्यांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. त्यामुळे कोणताही निर्माता स्पर्धा करणार नाही, अशी प्रतिक्रिया आमिरने दिली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभाग आणि डॉ. संजय बोरूडे यांच्यावतीने लठ्ठपणावरील चाईल्ड आॅबेसेटी या संकेतस्थळाचे गुरूवारी मंत्रालयात आमिर खान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
मी माझा सर्वाधिक वेळ पाणी फाऊंडेशनसाठी देत आहे. त्यानंतर उर्वरीत वेळात चित्रपटाचे काम करतो आहे. वॉटर संस्थेकडून तांत्रिक सहाय्य घेऊन जलसंधारणाची कामे यशस्वी केली. वातावरण बदलाचे मोठे संकट असून वनसंपदा वाढीवर भर द्यावाच लागेल असेही आमिर म्हणाला.
‘ही सेनेची भूमिका नाही’
येत्या २५ जानेवारीला ‘ठाकरे’ या चित्रपट प्रदर्शित होत आहे. २५ जानेवारीला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशा आशयाचे पोस्ट शिवसेनेशी संबंधित लोकांकडून केले जात आहेत. अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाईल उत्तर देण्याचीही भाषा केली जात आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र ही शिवसेनेची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.