मुंबईत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा विचार नाही, परिवहन मंत्र्यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 09:15 PM2018-08-07T21:15:50+5:302018-08-07T21:16:42+5:30
एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार का? या विवंचनेत मुंबईकर आहेत.
मुंबई - एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार का? या विवंचनेत मुंबईकर आहेत. त्यामुळे याबाबत शासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट घेतली. त्यावेळी, रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा कुठलाही विचार नसल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या भेटीत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा विचार नाही, असा खुलासा मंत्रिमहोदयांनी केला असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या बैठकीला परिवहन सचिव व परिवहन आयुक्त, अॅड.देशपांडे व वर्षा राऊत उपस्थित होते. रिक्षा-टेक्सी भाड्यात लवकरच दोन रुपयांनी वाढ होणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्र्यांची भेट मागितल्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री मंहोदयांनी रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा कुठलाही विचार नाही, असे आश्वासन देत मुंबईकरांना दिलासा दिल्याचे अॅड.शिरीष देशपांडे यांनी सांगितले.