मुंबई : बुलेट ट्रेनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील भूमिगत स्थानकाच्या कामादरम्यान ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊ नये, म्हणून ब्लास्टऐवजी सरफेस मायनर मशिनचा वापर करीत खोदकाम केले जात आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात सातत्याने धुळीमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर नोंदविण्यात येते. यात आणखी भर पडू नये म्हणून ही नामी युक्ती शोधण्यात आली आहे.
मुंबईतीलबुलेट ट्रेनच्या कामाने वेग पकडला असून, वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या स्थानकाच्या कामात उत्तरोत्तर प्रगती होत आहे. बुलेट ट्रेनकरिता जमिनीखाली ३२ मीटर खोल खोदकाम केले जात आहे. राज्यात बुलेट ट्रेनची चार स्थानके असून, या स्थानकांत वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार आणि बोईसरचा समावेश आहे. यापैकी वांद्रे-कुर्ला संकुल हे स्थानक भूमिगत आहे. तर, उर्वरित तिन्ही स्थानके जमिनीवर आहेत.
घणसोली, विक्रोळीत ब्लास्टिंग-
वांद्रे-कुर्ला संकुल येथून सुरू होणारी बुलेट ट्रेन शिळफाट्यापर्यंत भूमिगत धावणार आहे, तर शिळफाटा ते ठाण्यापर्यंतचा बुलेट ट्रेनचा प्रवास हा जमिनीवरून होणार आहे. सद्यस्थितीमध्ये ब्लास्टिंग केवळ घणसोली, विक्रोळी येथे केले जात आहे. येथे टनेल बोरिंग मशिन जमिनीमध्ये उतरविले जाणार आहे.
माती परीक्षणाचे काम -
१) मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून केले जात आहे.
२) ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत प्रकल्पस्थळी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
३) मातीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार असून, परीक्षणांती प्रकल्पातील कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने बांधकाम करायचे? याचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्यात जमिनीवरील बांधकाम सुरू -
१) राज्यात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या जमिनीवरील बांधकामास सुरुवात झाली आहे.
२) बीकेसी ते शिळफाटादरम्यानच्या २१ किमी बोगद्यापैकी पाण्याखालून जाणाऱ्या ७ किमी लांबीच्या बोगद्याचे काम सुरू झाले आहे.
३) मुंबई, ठाणे, वापी, सुरत, वडोदरा, आनंद आणि अहमदाबादला प्रकल्पामुळे फायदा होईल.
४) नोव्हेंबर २०२१ मध्ये काम सुरू झाले.