जीवनस्तर सर्वेक्षणात मुंबईची बाजी, १११ शहरांमध्ये तिसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 04:11 AM2018-08-14T04:11:08+5:302018-08-14T04:11:26+5:30

स्वच्छतेत अव्वल ठरल्यानंतर, आता ‘जीवनस्तर निर्देशांक २०१८’ अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातही मुंबई शहर सर्वोत्तम महानगर ठरले आहे.

Mumbai third in 111 cities | जीवनस्तर सर्वेक्षणात मुंबईची बाजी, १११ शहरांमध्ये तिसरा क्रमांक

जीवनस्तर सर्वेक्षणात मुंबईची बाजी, १११ शहरांमध्ये तिसरा क्रमांक

Next

मुंबई - स्वच्छतेत अव्वल ठरल्यानंतर, आता ‘जीवनस्तर निर्देशांक २०१८’ अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातही मुंबई शहर सर्वोत्तम महानगर ठरले आहे. केंद्र सरकारच्या ‘आवासन आणि शहरी कार्य मंत्रालय’ यांच्याद्वारे देशभरात प्रथमच जीवनस्तर निर्देशांक निश्चित करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १११ शहरांशी संबंधित विविध बाबींचा अभ्यास केल्यानंतर, मुंबई शहराला यात तिसरे स्थान मिळाले आहे.
गेल्या वर्षी स्वच्छतेत २९ क्रमांकावर घसरल्यामुळे मुंबई महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते. नवी मुंबईसारखे शहरही मुंबईपेक्षा पुढे असल्याने मुंबई महापालिकेचा कारभार व नागरी सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याची गंभीर दखल घेऊन त्रुटी असलेल्या क्षेत्रावर मेहनत घेत, त्यात सुधारणा करण्यावर महापालिकेने भर दिला होता. त्यामुळे या वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल ठरल्यानंतर, आता जीवनस्तर निर्देशांकातही मुंबई शहर ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या महानगरांमध्ये सर्वोत्तम महानगर ठरले आहे. हा निर्देशांक निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने शहरातील संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक व भौतिक बाबींशी संबंधित १५ बाबींचा अभ्यास करण्यात आला.
ज्यामध्ये प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण खुल्या जागा, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश होता. कुठल्याही शहरासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची बाब असते. या वर्गवारीत सर्वोत्तम कामगिरी असल्याची नोंद या सर्वेक्षणात घेण्यात आली आहे. यात पाणीपुरवठा, खुल्या जागा, गृहनिर्माण, उपलब्ध जागांचा प्रभावी वापर, वाहतूक, विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

अशी सुधारली स्वच्छतेत रँकिंग

गेल्या वर्षीय स्वच्छतेच्या रँकिंगमध्ये मुंबई २९व्या क्रमांकावर होती. त्यानंतर, ही रँकिंग सुधारण्यासाठी महापालिकेने खासगी संस्थेची मदत घेऊन मागे पडत असलेल्या क्षेत्रात मेहनत घेतली. त्रुटी दूर केल्याचे फलित म्हणून या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेला ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ ने गौरविण्यात आले.
मुंबईकरांना विविध सेवा सर्वोत्तम पद्धतीने देण्यासाठी महापालिका दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजनाद्वारे सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही याच समर्पित भावनेने महापालिका कार्यरत राहील. हा सन्मान मुंबईकरांचा आणि मुंबई महापालिकेचा गौरव आहे, अशी भावना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली आहे.
या सर्वेक्षणाबाबत माहिती मिळाल्यानंतर, महापालिकेने दोन ते तीन महिन्यांपूर्वी केंद्राकडे सादरीकरण केले होते. महापालिकेने आपल्या कारभारात केलेले बदल, इझ आॅफ डुइंग बिझनेस अंतर्गत व्यावसायिकांना दिलेले प्रोत्साहन, आॅनलाइन सेवा, पायाभूत सुविधांमध्ये वाढ, याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्याच्या आधारेच हा बहुमान मुंबईला मिळाला असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.
या सर्वेक्षणाने निश्चित केलेल्या काही निकषात मुंबईला कमी गुण मिळाले आहेत. याचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्यावर भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai third in 111 cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.