Join us

मुंबईत आता धोका अ‍ॅस्परजिलोसिसचा, कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आले नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 7:11 AM

Aspergillosis: ब्लॅक फंगसबरोबरच मुंबईत अ‍ॅस्परजिलोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते आहे. मधुमेहासारखा आजार, तसेच कोविड संसर्गाची लागण आणि उपचारांमध्ये स्टेरॉइडचा होणारा वापर यामुळे अ‍ॅस्परजिलोसिस संसर्गाचा कोविडनंतर रुग्णांना सामना करावा लागत आहे.​​​​​​​

मुंबई : ब्लॅक फंगसबरोबरच मुंबईत अ‍ॅस्परजिलोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते आहे. मधुमेहासारखा आजार, तसेच कोविड संसर्गाची लागण आणि उपचारांमध्ये स्टेरॉइडचा होणारा वापर यामुळे अ‍ॅस्परजिलोसिस संसर्गाचा कोविडनंतर रुग्णांना सामना करावा लागत आहे.नुकतच झेन रुग्णालयात हा संसर्ग असलेले दोन रुग्ण आढळले आहेत. पोस्ट-कोविड लंग फाइब्रोसिस आणि न्यूमोथोरॅक्समुळे एका ५० वर्षांच्या पुरुष रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले गेले. त्यांच्यात म्युकरमायकोसिसची लक्षणे दर्शविणारा कोणताही ब्लॅक डिस्चार्ज किंवा ब्लॅक क्रस्ट आढळून आला नव्हता. त्याची नेझल एंडोस्कोपी केली गेली आणि अ‍ॅस्परजिलोसिसचे निदान झाले. त्यांच्यासारखे बरेच रुग्ण आहेत जे या बुरशीजन्य संसर्गाविरुद्ध लढत आहेत.अ‍ॅस्परजिलोसिस हे एक बुरशीजन्य संक्रमण आहे जे ॲस्परजिल्समुळे उद्भवते. हा फंगस सर्वव्यापी आहे; पण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास त्यामुळे आजार उद्भवत नाही. कमजोर रोगप्रतिकारकशक्ती, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण, विशिष्ट रक्त कर्करोग असलेले, तसेच स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हा संसर्ग उद्भवण्याचा धोका जास्त असतो. सर्व पोस्ट-कोविड रुग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्गाचे वेळीच निदान करण्यासाठी नाकाची एंडोस्कोपी करून उपचाराची दिशा ठरविली जात असल्याचे चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे ईएनटी सर्जन डॉ. शलाका दिघे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, सहसा अ‍ॅस्परजिलोसिसच्या उपचारासाठी व्होरिकोनाझोल नावाची अँटी फंगल औषधी वापरतो. व्होरिकोनाझोलचा उपयोग बऱ्याच गंभीर बुरशीजन्य संक्रमणांच्या उपचारांमध्ये केला जातो. त्यापैकी एक आक्रमक ॲस्परजिलोसिस आहे, जो आपल्या फुप्फुसात सुरू होतो आणि हळूहळू रक्त प्रवाहातून इतर अवयवांमध्ये पसरतो. हे बुरशीजन्य संक्रमण कोरोना विषाणूसारखे नवीन नाही; परंतु अशा प्रकरणांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. कोविडनंतरच्या रुग्णांनी विशेषत: ज्यांनी स्टेरॉइडस्‌ किंवा दीर्घकालीन ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविक घेतले आहे किंवा दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घेतले आहेत त्यांनी रक्त शर्कराच्या पातळीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, तसेच नाकातून दुर्गंध येणे, डोळे दुखणे, डोळ्यातील सूज, गाल सुजणे, ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये, असे असे डॉ. दिघे यांनी सांगितले.

टॅग्स :आरोग्यमुंबई