मुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर येत्या 26 जानेवारी 2018 रोजी हल्ला घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. विमानळावरील स्वच्छतागृहात धमकीबाबतची एक चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ कार्गो टर्मिनल रिकामे करण्यात आले. तसेच यामध्ये पूर्ण तपासणी केल्यानंतरच कामगारांना प्रवेश देण्यात येत आहे. विमानतळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, हे पत्र सापडताच पोलिसांनी आणि बॉम्ब पथकानं कार्गो टर्मिनल रिकामं केलं आहे. सध्या प्रवाशांची पूर्ण तपासणी करुनच त्यांना विमानतळावर सोडण्यात येत आहे. अद्यापही सर्च ऑपरेशन सुरुच आहे. मात्र, असं असलं तरीही विमानाच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ कार्गो टर्मिनल खाली करण्यात आलं.