मुंबई : अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे कोकणासह मुंबईत पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून, शनिवारी सायंकाळी दाटून आलेल्या ढगांमुळे मुंबापुरीत दाखल झालेल्या कोसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. विशेषत: सायंकाळी ६नंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाने धावत्या मुंबईचा वेग काहीसा मंदावला.शनिवारी पूर्व उपनगरात सकाळी ११.३०च्या सुमारास दाखल झालेला पाऊस पाऊण तास कोसळला. धारावी, सायन, कुर्ला, विद्याविहार आणि घाटकोपरमध्ये पावसाच्या सरी कोसळत असतानाच भांडुपमध्ये मात्र कडाक्याचे ऊन पडले होते. पश्चिम उपनगरातही काहीशा फरकाने हीच परिस्थिती होती. माटुंग्यापासून पुढे म्हणजे मध्य आणि दक्षिण मुंबईत कडाक्याचे ऊन पडले होते. सायंकाळी ५नंतर मात्र अवघ्या मुंबापुरीत काळे ढग दाटले. परिणामी, सायंकाळी ६ वाजेनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे बरसणे रात्री ८नंतरही सुरूच राहिले. दक्षिण मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने पावसाने उपनगरांतही दमदार एन्ट्री केली. पूर्व व पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र होते.
मुंबईत कोसळधार व विजांचा कडकडाट
By admin | Published: October 04, 2015 2:47 AM