Mumbai: जलदगतीने महामुंबईला कवेत घेण्यासाठी...!
By सचिन लुंगसे | Published: April 17, 2023 11:51 AM2023-04-17T11:51:29+5:302023-04-17T11:51:59+5:30
Mumbai: दक्षिण मुंबईतून पूर्व - पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई व ठाण्याच्या दिशेने विना वाहतूककोंडी वेगवान प्रवास करता यावा म्हणून कोस्टल रोडसह सी-लिंक व फ्लायओव्हर्सची कामे हाती घेण्यात आली आहेत.
- सचिन लुंगसे
(वरिष्ठ प्रतिनिधी)
दक्षिण मुंबईतून पूर्व - पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई व ठाण्याच्या दिशेने विना वाहतूककोंडी वेगवान प्रवास करता यावा म्हणून महापालिका, एमएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या यंत्रणांकडून कोस्टल रोडसह सी-लिंक व फ्लायओव्हर्सची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंकसह भुयारी मेट्रो ३ वर्षभरात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. पुढील दहा वर्षांत मेट्रो मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचे वर्तुळ पूर्ण करणार असून, अशाच काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा घेतलेला आढावा...
वांद्रे-वर्सोवा-विरार सी लिंक
वर्सोवा-विरार सी लिंकमुळे पश्चिम उपनगरातल्या वाहतूक कोंडीला पूर्णविराम मिळणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागेल तेव्हा दिवसाला सुमारे ६० हजार वाहनांना याचा लाभ होईल.
वर्सोवा-विरार हा सर्वात मोठा प्रकल्प असून, वांद्रे-वर्सोवा सी लिंकचा पुढील भाग म्हणून वर्सोवा - विरार सी लिंक असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे तर एमएमआरडीए वर्सोवा-विरारचे काम करत आहे.
नरिमन पॉइंट ते वरळी कोस्टल रोड
कोस्टल रोडचे काम महापालिकेकडून केले जात आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल ते वरळीदरम्यान १०.५८ किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. यामुळे वेळेत ७० टक्क्यांची बचत होईल. ३० टक्के इंधन बचत साध्य होईल. नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
बोरिवली- ठाणे भुयारी मार्ग
बोरिवली - ठाणे भुयारी मार्गामुळे ६० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांवर येणार आहे. सध्या बोरिवली ते ठाणे हे अंतर २३ किमी आहे. या प्रकल्पामुळे हे अंतर ११ किमी होईल. ठाण्यातील टिकुजीनी वाडीपासून बोरिवलीजवळील पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत हा मार्ग असेल.
गोरेगाव - मुलुंड लिंक रोड
गोरेगाव मुलुंड लिंक रोड पालिकेचा प्रकल्प आहे. जो पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडतो. गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपासून पूर्व उपनगरातील मुलुंड येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा जोड रस्ता असेल. याची एकूण लांबी १२.२ किमी असून, त्या पैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खाली ४.७ किमी लांबीचा भूमिगत दुहेरी बोगदा आहे.
ऑरेंज गेट ते ग्रँट रोड पूल
दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणारा पूर्व मुक्तमार्ग येथून ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल महापालिकेकडून बांधण्यात येणार आहे. ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत तो असेल. या अंतरासाठी ३० मिनिटे ते ५० मिनिटे लागतात. हा पूल झाल्यानंतर ६ ते ७ मिनिटे लागतील.
कल्याण-डोंबिवलीसाठी...
कल्याण - डोंबिवलीवरून ठाणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास कोंडीमुक्त व्हावा यासाठी एमएमआरडीएमार्फत माणकोली ते मोठागाव दरम्यान उल्हासखाडीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, आज घडीला या प्रकल्पाचे एकूण काम ८४ टक्के झाले आहे.
माणकोली- मोठागाव खाडी पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने कल्याण आणि डोंबिवलीमधील प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.