नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी १६० किमी नेण्यासाठी सुरू असलेला काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण होताच मार्चपासून रेल्वेने १२ तासांत दिल्ली गाठणे शक्य होईल. सध्या या प्रवासाला १६ तास लागतात.
या मार्गाची गती वाढवण्याची डेडलाइन मार्चपर्यंत आहे. ६,६६१.४१ कोटी रुपये खर्च करून पायाभूत सुविधांत सुधारणा केली जात आहे. ट्रॅक, सिग्नल यंत्रणा अद्ययावत केल्या जात आहेत. मुंबई ते अहमदाबाद मार्गावर मानवरहित क्रॉसिंग बंद करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गावर जनावरे येऊ नयेत, यासाठी ३८० किमीहून अधिक मार्गावर धातूचे कुंपण घालण्याचे काम करण्यात आले आहे. ८० टक्क्यांहून अधिक स्विच कर्व्ह नवे लावण्यात आले आहेत.
विरार ते सुरतदरम्यान जाड वेब स्विच फेसिंग सेटचे काम पूर्ण झाले आहे, तर सुरत-बडोदा अहमदाबाददरम्यानचे काम लवकर पूर्ण होईल. नव्या स्विच कर्व्हमुळे वेग कमी न करता ट्रेन ट्रॅक बदलू शकते. राजधानी, शताब्दी, तेजसला फायदा
मिशन रफ्तारमुळे केवळ मुंबई-दिल्ली मार्गावरील अनेक ट्रेनचा स्पीड वाढणार असून, राजधानी, शताब्दी, तेजस, दुरांतो आणि डबलडेकर एक्स्प्रेसदेखील १६० किमी ताशी अशा वेगाने धावतील.
मुंबई-दिल्ली मार्ग मिशन रफ्तार या योजनेअंतर्गत तयार केला जात आहे. त्यामुळे प्रवासातील अंतर कमी होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.