मुंबई : पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये फक्त ९८ हजार १८२ दशलक्ष लीटर (फक्त ६.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकेच हे पाणी असल्याने महापालिकेने मुंबईत बुधवार, ५ जूनपासून दुप्पट म्हणजे १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. दरम्यान, ही कपात ठाणे व भिवंडीतही लागू असणार आहे, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.
जेमतेम महिनाभर पुरेल साठा-
१) मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते.
२) २९ मे रोजी सातही धरणांमध्ये एक लाख २५ हजार ४५२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असून, राज्य सरकारने अतिरिक्त दोन लाख २८ हजार १४० दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा उपलब्ध करून दिले आहे.
३) मात्र, हा पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच आहे.
४) २०२१-२२ या दोन वर्षांत १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. मात्र २०२३ मध्ये ऑक्टोबरमध्ये तुलनेने पाऊस झाला नाही.
५) त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. सातही धरणांतील पाणीसाठ्यावर पालिका अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.