Join us  

मुंबईकरांचा रविवार होणार आरामदायी; पोलीस आयुक्तांचे मुंबई ध्वनिप्रदूषणमुक्तीचे ध्येय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 8:11 AM

मुंबईत ध्वनिप्रदूषण कमी करण्यास आयुक्त संजय पांडे यांनी पावले उचलली आहेत

मुंबई :  नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यामुळे संडेस्ट्रीटच्या ट्रीट पाठोपाठ आता, मुंबईकरांचा रविवार आणखीन आरामदायी होणार आहे. कारण आयुक्तांनी रविवारी ध्वनिप्रदूषण रोखण्यास बांधकामाच्या कामांनाही सुट्टी घेण्यास सांगितली आहे. याबाबत ते लवकरच अधिक  माहिती देणार असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. मुंबईत ध्वनिप्रदूषण कमी करण्यास आयुक्त संजय पांडे यांनी पावले उचलली आहेत. समाजमाध्यमावर येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार व समस्येकडे ते लक्ष देत आहेत. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाइव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. त्यानुसार,पांडे विकासकांची बैठक घेत,मुंबई शहरात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बांधकामासंबंधित कामे करण्यास बंदी घातली आहे. बांधकामस्थळी आवाज रोखणारे अडथळे बसवा, आवाजाची पातळी डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त नकाे,रक्षक मुख्य रस्त्यांवरच न ठेवता केवळ बांधकामाच्या ठिकाणी तैनात करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यापाठोपाठ रविवारी ‘संडेस्ट्रीट’ जाहीर केल्याने सोशल मीडियासह सगळीकडे आयुक्तांच्या कामाची चर्चा आहे. यासाठी घेतला निर्णयआता रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त ठेवण्याचे आयुक्तांचे ध्येय आहे. रविवारी बांधकाम बंद ठेवण्याचा विचार आहे,अशी माहिती पांडे यांनी दिली आहे. सुट्टीचा एक दिवस मुंबईकरांसाठी आरामदायी जावा या दृष्टिकोणातून ही पावले उचलण्यात येत आहे. याबाबत नेटिझनकडून कुठे कौतुक तर कुठे मजुरांचे काय होणार असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले.   याबाबत ते लवकरच माहिती देणार असल्याचे सांगितले आहे.