मुंबई : भारतातील सर्वात मोठा पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) पुलावरून मुंबईकरांना लवकरच सुसाट प्रवास करता येणार आहे. एमटीएचएल पुलाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने डोळ्यासमोर ठेवले आहे. या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत जायला केवळ २० मिनिटे लागणार असून अद्याप या पुलाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवीन वर्षात ट्रान्स हार्बर लिंक सेवेत, डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण
टोलसाठी थांबायची गरज नाही या पुलावरील टोल नाक्यावर ‘ओपन रोड टोलिंग सिस्टीम’ ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे टोल बूथवर थांबण्याची, रांग लावण्याची आवश्यकता वाहनचालकांना भासणार नाही. १०० किमी प्रतितास वेगाने वाहन गेले तरी टोलचे पैसे आपोआप कापले जाणार.
पुलाला अटल सेतू नाव माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाला अटल सेतू असे नाव देण्यात येणार असून या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने सुमारे १८ हजार कोटी मोजले आहेत.
पुणे, अलिबाग, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची सोयया पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येणार असल्याने जेएनपीटी, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबरमध्ये ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल, असे एमएमआरडीएतील सूत्रांनी सांगितले.