आनंदाची बातमी! वनआच्छादनात मुंबई शहर देशात टाॅपवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:40 AM2022-01-17T08:40:47+5:302022-01-17T08:41:00+5:30
राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीची फलश्रुती आता दिसू लागली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती : पर्यावरण आणि वनांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वनसर्वेक्षण संस्था, डेहराडून यांनी २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून राज्यात २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये २० चाैरस किमीने वनक्षेत्र वाढले आहे. गेल्या पाच वर्षांपासून वन आणि वन्यजिवाबाबत महाराष्ट्राची भागीदारी कमालीची वाढलेली आहे. सध्या विदर्भातील वनक्षेत्र वाघ व बिबट्यांचे वाढत्या संख्येने बहरलेले आहे. राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीची फलश्रुती आता दिसू लागली आहे.
२०१९ मध्ये राज्यात ५०,७७८ चाै.कि.मी. इतके वनाच्छादन होते. यामध्ये २०२१ मध्ये ०.०४ टक्क्याने वाढ झाली आहे. आता ५०,७९८ चाै.कि.मी. इतके झाले आहे. यामध्ये वनक्षेत्र हद्दीत ४१ चाै.कि.मी.ने वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे वनक्षेत्राच्या बाहेर हे वनाच्छादित क्षेत्र २१ चाै.कि.मी.ने वाढलेले दिसून येते. अति घनदाट वन प्रकारात १३ चाै.कि.मी.ने, मध्यम घनदाट वन प्रकारात १७ चाै.कि.मी.ने वाढ, तर धक्कादायक बाब म्हणजे विरळ वनांमध्ये १० चाै.कि.मी.ने घट झालेली आहे. मराठवाड्यात वनांची संख्या अधिक आहे.
बांबूचे क्षेत्र मात्र घटले
राज्यातील बांबू क्षेत्र वन २०१९ च्या तुलनेत १८८२चाै.किमी.ने कमी होऊन बांबूचे क्षेत्र १३२६ चाै.किमी. इतके झाले आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यामुळे बांबूचे क्षेत्र टिकून आहे.
कांदळवनात रायगड अव्वल
मुंबई, ठाणे, वसई, रायगड भागातील समुद्री जंगल म्हणून ओळख असलेल्या कांदळवन मध्यंतरी दुर्लक्षित होते. कांदळवनाच्या संवर्धनाकरिता सरकारने अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे एक पद निर्माण केले. खाडी क्षेत्रात कांदळवनाची खबरदारी घेतली जाते. विशेष म्हणजे कांदळवन क्षेत्रात ३२४.२९ चाैरस किमीने वाढ झाली, यात रायगड जिल्हा अव्वल आहे.
मुंबईत ११० चाैकिमी वनाच्छादन
देशातील सात महानगरातील वनाच्छादनाची तुलना केली असता दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, लखनाै, कोलकाता या महानगरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबई महानगरात ११० चाैरस किमी वनाच्छादन असून, मुंबईच्या भाैगोलिक क्षेत्राच्या २५ टक्के आहे. त्यामुळे वनक्षेत्र राखून ठेवणारे देशातील नंबर एकचे महानगर बनले आहे. सलग २०११ पासून मुंबई ते २०२१ पर्यंत मुंबईत ९ टक्क्याने वनाच्छादन वाढले आहे.