Join us

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये मुंबईच अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 4:33 AM

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत विविध उपक्रम चांगल्या रितीने राबवून स्वच्छता अभियानातील कामगिरी सर्वोत्कृष्ट करण्याचा पूर्ण क्षमतेनिशी महापालिका प्रयत्न करीत आहेत.

मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत विविध उपक्रम चांगल्या रितीने राबवून स्वच्छता अभियानातील कामगिरी सर्वोत्कृष्ट करण्याचा पूर्ण क्षमतेनिशी महापालिका प्रयत्न करीत असून, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महापालिका अव्वल ठरेल, असा विश्वास घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त अशोक खैरे यांनी व्यक्त केला.जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खाते व सार्वजनिक शौचालय प्रचालक समन्वय समिती यांच्या सौजन्याने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खैरे बोलत होते. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालये नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सार्वजनिक शौचालय प्रचालक समन्वय समितीचे पदाधिकारी पप्पू राभडिया, सुभाष वीरोचन यांनी मनोगत व्यक्त केले. घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अवेक्षकदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले.लोकप्रतिनिधींनीदेखील या कार्यक्रमात उपस्थिती लावली. सार्वजनिक शौचालय प्रचालक समन्वय समिती यांनी ‘पैसे द्या व वापरा’ तत्त्वावरील शौचालयांच्या प्रचालनामधील अडचणी, तसेच वस्ती पातळीवरील सामुदायिक शौचालय प्रचालनाबाबतच्या समस्यादेखील खैरे यांच्यासमोर मांडल्या. त्याबाबत खैरे यांनी सध्या स्वच्छ सर्वेक्षण - २०२० दरम्यान सर्व शौचालय प्रचालकांना, तसेच स्थानिक संस्थांना व संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत करावयाच्या आवश्यक उपाययोजना प्रत्येक शौचालयात करण्याचे निर्देश दिले. अशासकीय संस्थांचे प्रचालक, तसेच वस्ती पातळीवरील सामुदायिक शौचालयांचे प्रतिनिधी यांची मते जाणून घेतल्यानंतर त्याबाबत निश्चितपणे योग्य विचार करण्यात येईल, असे सांगितले.विशेष कार्य अधिकारी सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन व आयोजन केले. विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप यांनी प्रास्ताविक केले. शौचालय दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट, मुंबई स्वच्छ ठेवण्याकरिता संस्थांची जबाबदारी, लोकसहभागाचे महत्त्व, शौचालयांकरिता दर्जा प्राप्त करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात माहिती देण्यात आली.

टॅग्स :मुंबई